भालाफेकपटू नीरज चोप्राने  भारतीय खेळाडूं विषयी केलं “हे” ट्विट, म्हणाला

    राष्टकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू (Indian Athletes) सातत्याने चांगली कामगिरी करीत असून यामुळे भारताच्या खात्यात दररोज पदकांची नोंद होत आहे. यामुळे भारत सध्या पदक संख्यांमध्ये सातव्या स्थानी असून याच पार्श्वभूमीवर भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) ट्विटरच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केल आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन्ग जंप स्पर्धेत भारताला पहिलं पदक जिंकून देणाऱ्या तेजस्वीन शंकरसोबत (Tejaswin shankar) नीरज ने एक फोटो ट्वीट करत भारताच्या खात्यात आणखी काही पदक जमा होणार आहेत, असा विश्वासही व्यक्त करून दाखवला आहे.

    नीरज चोप्रा ट्विटर द्वारे खेळाडूंना अभिनंदन करताना म्हणाला, “बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आमच्या भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलंय. भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांचे आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन. आमच्या सर्व वेटलिफ्टरनी चांगली कामगिरी केली. मीराबाई, जेरेमी, अचिंता, संकेत, बिंदियारानी, ​​विकास, गुरुराजा, लवप्रीत, हरजिंदर आणि गुरदीप यांचं देशासाठी पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन.”

    तसेच नीरज चोप्रानं भारताचा पुरुष टेबल टेनिस संघ आणि महिला लॉन बॉल्स संघाचं सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय. यासोबतच त्यांनं बॅडमिंटन मिश्र सांघिक, ज्युदो खेळाडू आणि स्क्वॉशपटूंनी मिळवलेलं पदकं देशाची शान असल्याचे ट्विट मध्ये म्हटले आहे. गोल्ड कास्ट २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील एक फोटोही त्याने तेजस्वीन शंकरसोबत शेअर केला आहे.