ज्युनिअर तेंडुलकरची हैद्राबाद संघा विरूद्ध दमदार कामगिरी

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची सईद मुश्ताक अली टी २० (Saeed Mushtaq Ali T20) स्पर्धेत दमदार कामगिरी सुरु आहे. सईद मुश्ताक अली टी २० स्पर्धेत तो सध्या गोव्याच्या संघाकडून खेळत असून त्याने त्याच्या गोलंदाजीने स्पर्धेतील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या हैद्राबादचा(Hyderabad) जवळपास निम्मा संघ एकट्याने गारद करून आपली कारकिर्दितील सर्वोत्त कामगिरी केली आहे.

    गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने हैदराबाद संघाविरूद्ध ४ षटकात फक्त १० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. आपल्या स्पेलमधील एक षटक त्याने निर्धाव देखील टाकले. यात हैदराबादचा स्टार फलंदाज तिलक वर्माचा देखील समावेश आहे. तिलक वर्माने हैद्राबाद संघासाठी अर्धशतकी खेळी करून त्याच्या जोरावर हैदराबाद संघाने २० षटकात ६ बाद १७७ धावा केल्या आहेत.

    अर्जुन तेंडुलकरने आपल्या स्पेलच्या पहिल्या षटकात फक्त १ धाव दिली होती. त्यानंतर त्याने तिसरे षटक निर्धाव टाकले. अर्जुनने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या. अर्जुनने तिलक वर्मा, प्रतीक रेड्डी, बुद्धी राहुल आणि टी रवी तेजा यांची विकेट घेतली. अर्जुनने आपल्या स्पेलमधील १७ चेंडू निर्धाव टाकले. गोवा विरूद्ध हैदराबाद सामन्यात हैदराबादचा कर्णधार तन्मय अगरवालने ४१ चेंडूत ५५ धावा तर तिलक वर्माने ४६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. हैदराबादचे १७७ धावांचे आव्हान गोव्याच्या संघासमोर ठेवले होते. मात्र गोव्याच्या संघाला केवळ १४० धावा करता आल्या त्यामुळे या सामन्यात हैद्राबाद संघ ३७ धावांनी विजयी झाला.