“ज्युनियर ” तेंडुलकर मुंबईचा संघ सोडणार

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर हा लवकरच मुंबई संघाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) त्याच्या क्रिकेट करिअरबाबत मोठा निर्णय घेतला असून पुढील रणजी सामान्यांपुर्वी तो मुंबई संघ सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली असून ते प्रमाणपत्र त्याला एमसीए कडून देण्यात आले आहे. मुंबई संघाचा भाग असूनही जुनियर तेंडुलकरला मुंबईसाठी फारसे सामने खेळता आले नव्हते. त्यामुळेच मुंबई संघ सोडून त्याने गोव्यासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

    २२ वर्षाच्या डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील टी २० स्पर्धा सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात तो हरियाणा आणि पाँडेचेरी विरूद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने मुंबईच्या संघात स्थान मिळवले. मात्र त्याला एकही सामना न खेळवता संघातून वगळण्यात आले. त्यामुळे त्याला आपली गुणवत्ता दाखवून देण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने ‘अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दिसाठी जास्तीजास्त सामने खेळणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्हाला असे वाटते की अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या राज्याकडून खेळ गरजेचे आहे कारण त्याला जास्तीजास्त स्पर्धात्मक सामने खेळायला मिळतील.’ असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. अर्जुन तेंडुलकरला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना वाटके ती या युवा गोलंदाजाकडे चांगला दृष्टीकोण आणि वर्क इथिक्स आहेत. त्याला फक्त जास्तीजास्त सामने खेळण्याची संधी मिळण्याची गरज आहे.

    अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून खेळणार या वृत्ताला गोवा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
    गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलिकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘आम्हाला डावखुरा वेगवान गोलंदाज हवा होता. हा डावखुरा गोलंदाज मधल्या फळीत फलंदाजीतही आपले योगदान देईल. या पार्श्वभूमीवर आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोव्याच्या संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही हंगामापूर्वी मर्यादित षटकांचे काही चाचणी सामने खेळवणार आहोत. अर्जुन हे सामने खेळेल. त्यानंतर निवड समिती त्याची कामगिरी पाहून त्यावर निर्णय घेतील.’