खडवली रेल्वे परिसर बनालाय मृत्यूचा सापळा, स्टेशन प्रबंधकांना निलंबित करण्याची मागणी

गेल्या कित्येक वर्षांपासून कितीतरी नागरिकांचा बळी गेला आहे, पण रेल्वे प्रशासनास जागच येत नाही. त्यातच भर म्हणून आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान रेल्वे रुळावरुन जात असताना देखील फाटक उघडे ठेवण्यात आले.

    कल्याण : खडवली रेल्वे परिसर मृत्यूचा सापळा बनला असून रुळावरुन गाडी जात असताना गेट उघडा राहिल्याने खडवली रेल्वे प्रशासनाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे खडवली रेल्वे स्थानकाला वालीच उरला नसल्याची भावना नागरिकांमध्ये असून गेटमनच्या वारंवार झोपण्याच्या तक्रारी देखील येत आहेत. यामुळे स्टेशन प्रबंधकांना निलंबित करण्याची मागणी मनसेच्या दिनेश बेलकरे यांनी केली आहे.

    मध्य रेल्वेचे गजबजलेले खडवली रेल्वे स्थानक हे नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. प्रवासी, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी वारंवार मागणी करूनही, ह्या रेल्वे स्थानकातील मुलभूत सुविधांकडे आणि समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे. खडवली रेल्वे ब्रीज चढण्या-उतरण्यासाठी अत्यंत धोकादायक असुनही गर्भवती महिला, अपंग आणि वृद्धांना तर जीवाची बाजी लावून ब्रीज वर चढावे लागते. येथे एलिव्हेटर किंवा एस्किलेटरची नितांत गरज आहे. तसेच स्वच्छता गृहात जाण्यासाठी जीव मुठीत धरून वाट काढावी लागते. स्वच्छता गृहातच्या प्रवेश द्वाराच्या अगदी लगतच रेल्वे ट्रॅक आहे. एकंदरीत रेल्वे स्थानकाची रचनाच एक मृत्यूचा सापळ्याप्रमाणे आहे.

    गेल्या कित्येक वर्षांपासून कितीतरी नागरिकांचा बळी गेला आहे, पण रेल्वे प्रशासनास जागच येत नाही. त्यातच भर म्हणून आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान रेल्वे रुळावरुन जात असताना देखील फाटक उघडे ठेवण्यात आले. सुदैवाने मोठा अपघात टळला आणि निष्पाप लोकांचा जीव वाचला. खडवली स्टेशन प्रबंधकांची नेमणुक येथे का करण्यात आली हाच मोठा प्रश्न असल्याचे बेलकरे यांनी म्हंटले आहे.

    तर समस्या अजून वाढतच चालल्या असून प्रवाशांच्या मागण्या दुर्लक्षीत केल्या जातात आणि दिवसेंदिवस रेल्वे अपघात दगावणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे ह्या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्टेशन प्रबंधकांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी मनसेचे दिनेश बेलकरे रेल्वे प्रशासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.