जाणून घ्या सुवर्णपदक विजेता सुधीरचा प्रेरणादायी प्रवास

  राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) सातव्या दिवशी भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची भर पडली. यापैकी राष्टकुल स्पर्धेत पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर सुवर्ण कामगिरी करून नवा इतिहास रचला. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे सध्या सर्वस्थरावून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी, इथपर्यंत पोहोचण्याचा सुधीरचा प्रवास इतका सोपा नव्हता.

  हरियाणातील सोनीपत येथील लाठ गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला सुधीर लहानपणापासूनच हुशार होता. मात्र वयाच्या पाचव्या वर्षी ऐन उमेदीच्या काळात त्याला पोलिओ सारख्या आजाराने ग्रासले. त्यामुळे सुधीरला पायाच्या त्रासामुळे अपंगत्व आले. मात्र त्याने हार न मानता २०१३ मध्ये शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्याने पॉवरलिफ्टिंग करायला सुरूवात केली. त्यात सततच्या सरावामुळे हा खेळ त्याच्या जीवनाचा भाग बनला.

  पॅरा खेळाडू वीरेंद्र धनखड याच्याकडून प्रेरित होऊन सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग सुरू केली. अवघ्या दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने त्याने राष्ट्रीय स्तरावर मजल मारून राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकून राज्याच्या शिरपेचार मानाचा तुरा रोवला. सुधीर सात वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता ठरला आहे.

  सुधीरने २०२१ आणि २०२२ मध्ये स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया हा किताब पटकावला आहे. येथूनच सुधीरच्या मनात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली. यानंतर त्याने बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्यासाठी तो दिल्लीत येथे तयारी करीत होता. रोज पाच तास तो सराव करत असताना, सकाळी तीन तास आणि सायंकाळी दोन तास यशाला गवसणी घालण्यासाठी सुधीर रोज २५० किले वजन उचलत मेहनत घेत होता.

  शरीर तंदुरुस्तीकरीता सुधीर हा नेहमीच स्वदेशी खाद्यपदार्थांना प्राधान्य देत असून सध्या देखील तो दररोज पाच लिटर दूधासोबत हरभरा आणि बदाम असे पदार्थ खातो. यामुळे त्याचे शरीर पूर्णपणे नैसर्गिक राहते. नैसर्गिक आणि स्वदेशी खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या आणि स्टिरॉइड्स वापरू नका असा सल्ला तो इतर खेळाडूंनाही देत असतो. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी सुधीर हा आधीपासूनच तयारी करीत असून यासोबतच सुधीरने पुढील वर्षी होणाऱ्या हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्ससाठी देखील पात्रता मिळवली आहे.

  राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या पुरूष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं एकतर्फी प्रदर्शन केले असून तो स्पर्धेत सुरुवातीपासून इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे होता. त्याने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले. सुधीरचे वजन हे ८७. ३० इतके आहे. ज्यामुळे त्याला स्पर्धेत १३४. ५ गुण मिळाले असून या गुणांसह त्यानं भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.