स्लम सॉकरमधील महाराष्ट्राच्या स्टार फुटबॉलपटूला फिफा विश्वचषकासाठी आमंत्रण

    मुंबई : आजपासून जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगाच्या कान्याकोपऱ्यातील अनेक देशांचे संघ एकमेकांशी फुटबॉलच्या मैदानावर भिडणार असून याची उत्सुकता आता फुटबॉल चाहत्यांना लागली आहे. प्रथमच कतार मध्ये यावर्षीची फिफा विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

    जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा आयोजनात फिफाने महाराष्ट्राच्या नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची आठवण आवर्जून ठेवली आहे. स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलपटू बनवण्याच काम गेले अनेक दशकं विजय  बारसे यांनी केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटाच्या माध्यमातून विजय बारसे यांची कहाणी सर्वांनी पाहिलीच आहे. आता फिफा ने विजय बारसे यांच्या कार्याची आठवण ठेऊन त्यांच्या एका शिष्याला विश्वचषक पाहण्यासाठी थेट कतारला येण्याचे आमंत्रण दिल आहे.

    स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉलपटू बनलेला शुभम पाटील हा तरुण विजय बारसे यांच्या स्लम सॉकर चा प्रतिनिधित्व करत फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला गेला आहे. ”जरी फुटबॉल विश्वचषकाच आयोजन करणारी फिफा जगातील एकश्रीमंत संघटना असली, तरी फुटबॉल मुळात गरीबांचा खेळ आहे आणि फुटबॉलचा सर्वात मोठं आयोजन करताना फिफाने स्लम सॉकर खेळणाऱ्या गरीब मुलांची आठवण ठेवली आहे. हेच महत्त्वाचे आहे,” असे मत विजय बारसे यांनी व्यक्त केलं आहे. शुभम पाटील अत्यंत गरीब घरातून आला असून फुटबॉलच्या माध्यमातून त्याने आपले जीवन नव्याने उभारले आहे. आता तो विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाणार असून ही त्याच्यासह सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.