kho kho

राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत (National Kho - Kho Competition) दुसर्‍या दिवशी पुरुषांमध्ये महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर, कर्नाटकाने त्रिपुरावर व कोल्हापूराने उत्तराखंडवर मोठे विजय मिळवले.

  मुंबई : ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (National Kho – Kho Competition) २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर(Jabalpur), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत दुसर्‍या दिवशी पुरुषांमध्ये महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर, कर्नाटकाने त्रिपुरावर व कोल्हापूराने उत्तराखंडवर मोठे विजय मिळवले. महिलांमध्ये केरळने गोव्यावर, कोल्हापूरने बिहारवर तर कर्नाटकाने उत्तराखंड वर सहज विजयश्री प्राप्त केली.

  महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ‘ब’ गटातील हिमाचल प्रदेशवर २४-०८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकर (३:०० मि. संरक्षण व २ गडी), अनिकेत पोटे (२:४० मि. संरक्षण व ३ गडी), कर्णधार सुयश गरगटे (२:०० मि. संरक्षण व ३ गडी), गजानन शेगाळ (२:०० मि. संरक्षण) व मिलिंद कुरपे (४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करत मोठ्या विजयात बहुमोल वाटा उचलला. पराभूत हिमाचलच्या रोहित वर्मा व राहुलने थोडाफार प्रतिकार केला.

  पुरुषांच्या ‘क’ गटातील कोल्हापूराने उत्तराखंडवर ३१-१० असा एक डाव २१ गुणांनी मोठा विजय प्राप्त केला. या सामान्यत कोल्हापूरच्या रोहण शिगटे (२:१० मि. संरक्षण व ८ गडी), अवधूत पाटील (२:३० मि. संरक्षण व ३ गडी) व अविनाश देसाई (१:५० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी चौफेर खेळाचे प्रदर्शन केले सहज विजय मिळवला तर पराभूत उत्तराखंडच्या कोणत्याच खेळाडूला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.

  महिलांमध्ये ‘फ’ गटातील कर्नाटकने उत्तराखंडवर १५-०१ असा डावाने एकतर्फी विजय साजरा केला. कर्नाटकच्या के. आर. तेजस्विनीने पहिल्या डावात नाबाद ९:०० मि. संरक्षण केल्याने कर्नाटकला मोठा विजय साजरा करता आला. त्यांच्याच बी. चित्राने दुसर्‍या डावात नाबाद ६:४० मि. संरक्षण व ३ बळी मिळवताना तेजस्विनीला उत्कृष्ट साथ दिली तर एल. मोनिका (५ बळी} के. आर. दिव्या (४ बळी) यांनीही विजयात महत्वाची कामगिरीची नोंद केली. उत्तराखंडच्या अंजु आर्या व भारती गिरी यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

  महिलांच्या ‘ग’ गटात केरळने गोव्यावर १२-०३ असा एक डाव ९ गुणांनी पराभव केला. केरळच्या अपर्णाने (४:३० मि. संरक्षण) करत विजयात मोलाचा वाटा ऊचलला. तर पराभूत गोव्याच्या कविता देविदास ( १:५०, १:१० मि. संरक्षण) व कर्णधार प्रमिता वेळीप (१:३० मि. संरक्षण व २ बळी)  यांनी दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

  इतर निकाल: पुरुष विभागात कर्नाटकने त्रिपुरावर १९-०६ तर महिला विभागात कोल्हापूराने बिहारवर ३४-११ असा विजय साजरा केला.