महाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता

स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला कबड्डी संघ शनिवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरला. संघाला अंतिम सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.

  नॅशनल चॅम्पियन हिमाचल प्रदेश संघाने विजेतेपदाचा बहुमान पटकावला. हिमाचल प्रदेश टीमने फायनलमध्ये महाराष्ट्रावर २७-२२ ने मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून विजयासाठी आंतरराष्ट्रीय रेडर साेनाली शिंगटे आणि पुजा यादवने सर्वाेत्तम कामगिरी केली. मात्र, टीमला अवघ्या पाच गुणांच्या पिछाडीने पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र संघाने गटातील सामन्यात हिमाचलला धुळ चारली हाेती. याच पराभवाची परतफेड करताना हिमाचलने आता अंतिम फेरीत महाराष्ट्रावर मात केली.

  महाराष्ट्र महिला संघाने पहिल्यांदाच नॅशनल गेम्समध्ये पदकाचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली. टीमने विजयी माेहिम कायम ठेवताना यशस्वीपणे अंतिम फेरीचा पल्ला गाठला हाेता. स्नेहल शिंदेचे कुशल नेतृत्व, साेनाली शिंगटे, पुजा यांची सर्वाेत्तम चढाई आणि अंकिता जगताप, रेखा यांच्या सुरेख पकडीच्या बळावर महाराष्ट्राला सामन्यागणिक विजयाची नाेंद करता आली.

  महिला खेळाडूंची कामगिरी काैतुकास्पद : काेच माेकळ

  महाराष्ट्र महिला संघाने बलाढ्य टीमला धुळ चारत अंतिम फेरी गाठली. यादरम्यान झालेल्या प्रत्येक सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे संघाला राैप्यपदकाचा बहुमान मिळवता आला. सुवर्णपदकासाठी संघाचा प्रयत्न काहीसा अपुरा पडला. मात्र, या पदकाने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे, अशा शब्दात प्रशिक्षक संजय माेकळ यांनी उपविजेत्या महिला संघावर काैतुकाचा वर्षाव केला.

  संघाला मेहनतीचे फळ मिळाले : शिरगावकर

  महाराष्ट्र महिल संघाने गुजरातमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी कसून तयारी केली. तीन आठवड्यांच्या सराव शिबिरात सर्वांनी प्रचंड मेहनत केली. याच मेहनतीतून संघाला पदकाचा बहुमान मिळवता आला. संघातील प्रत्येक खेळाडूंनी सामन्यागणिक सर्वाेत्तम खेळी केली. त्यामुळे हे माेठे यश संघाला मिळाले, अशा शब्दात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी महिला संघाचे काैतुक केले.