“या” भारतीय बॉक्सर्सकडून पदक निश्चित

    बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) बुधवारी भारतीय बॉक्सर्सनी दमदार कामगिरी करत भारतासाठी आणखीन दोन पदके निश्चित केली आहेत. नीतू गंघास आणि मोहम्मद हुसामुद्दीन या बॉक्सर्सनी (Boxers) आपल्या प्रतिस्पर्ध्याला सामन्यात धूळ चारत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विजयासोबतच दोन्ही बॉक्सर्सनी किमान ब्राँझ पदक (Bronze) पक्के केले आहे.

    नीतू गंघास ही महिला विभागाच्या ४८ किलो वजनी गटात सहभागी झाली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिच्यासमोर उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लाईडचे आव्हान होते. या लढतीत नीतूने प्रतिस्पर्ध्याला जोरदार पंच मारत सुरुवातीपासूनच चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. नीतूच्या झंझावातासमोर निकोल क्लाईड तग धरू शकली नाही. आणि अखेर तिच्या प्रशिक्षकांनी निकोल क्लाईडला या लढतीमधून माघार घेण्यास सांगितले. त्यानंतर नीतूला एबीडी अर्थातच प्रतिस्पर्ध्याने लढत सोडून देणे याच आधारावर विजयी घोषित करण्यात आले. नीतुने ५-० या फरकाने सामना जिंकला.

    निजामाबाद च्या २८ वर्षीय मोहम्मद हुसामुद्दीन याने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात नामीबियाच्या ट्रायागेन मार्निंग नदेवेलो यावर ४-१ ने मात करत सामना जिंकला. या विजयामुळे मोहम्मद हुसामुद्दीन हा अंतिम ४ मध्ये पोहोचला असून त्याने भारतासाठी कांस्यपदक पक्के केले आहे. भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीन याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील सलग दुसरे पदक आपल्या नावावर केले. त्याने गोल्ड कोस्टमध्ये २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझ पटकावले होते.