
BCCI Selection Committee : बीसीसीआयची पुरूष वरिष्ठ निवडसमितीमध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. पश्चिम विभागाचे निवडसमिती सदस्य आणि भारताचे माजी गोलंदाज सलिल अंकोला आपलं पद सोडणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे याला निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर असल्याचे बोलले जात आहे. सलिल अंकोला यांनी क्रिकेटबरोबरच चित्रपटात देखील आपले नशीब आजमावले होते.
दोन निवड समिती सदस्य न घेण्याचा निर्णय
बीसीसीआयने एका विभागातून दोन निवड समिती सदस्य न घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगकर हा मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. बीसीसीआयने त्याची काही महिन्यापूर्वीच निवडसमिती अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
हे दोघेही पश्चिम विभागातून
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अजित आगकर आणि सलिल अंकोला हे दोघेही पश्चिम विभागातून येतात. त्यामुळे बीसीसीआयने सलिल अंकोला यांचा निवडसमिती सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर तो न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयची 25 सप्टेंबरला होणार सर्वसाधारण बैठक
भारतीय क्रिकेट बोर्डाने सध्याच्या निवडसमिती सदस्यांसोबत एका वर्षाचा करार केला आहे. त्या सर्वांना डिसेंबर महिन्यात पुन्हा पदासाठी अर्ज भरावा लागणार आहे. अजित आगरकर, एसएस दास, सुब्रोतो बॅनर्जी, एस शरथ, सलिल अंकोला ही सध्याची निवडसमिती आहे.
अर्ज मागवण्याची परवानगी
गोवा येथील सर्वसाधारण बैठकीवेळी बीसीसीआयला निवड समिती सदस्य पदासाठीचे अर्ज मागवण्याची परवानगी मिळेल असे कळते आहे. 25 सप्टेंबरला बीसीसीआयची 92 वी सर्वसाधारण बैठक होणार आहे. गेली बैठक ही 18 ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबईत झाली होती.