मेस्सीला धक्का! विश्वविजेत्या अर्जेंटिनाचा ४९व्या क्रमांकावरील सौदी अरेबियाकडून २-१ ने पराभव

अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर  विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतच त्याला सलामीचा सामना गमवावा लागला आहे. सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सीने (१० मिनिटं) पेनल्टीच्या मदतीनं एक गोलं केला.

    नवी दिल्ली – फिफा विश्वचषकात मंगळवारी मोठा उलटफेर पहावयास मिळाला. त्यात विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचा ४९ व्या क्रमांकावर असणाऱ्या सौदी अरेबियाने २-१ असा धक्कादायक पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिना ग्रुप-सी मध्ये शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे.

    सौदी अरेबियाने दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ करत २ गोल केले. पहिला गोल सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला अल-शाहरानीलने डागला. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत म्हणजे ५३ व्या मिनिटाला सलेम अल-दावसारीने दुसरा गोल केला. अर्जेंटिनाच्या लियोनल मेसीने १० व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला होता. त्यानंतर त्याच्या संघाला एकही गोल करता आला नाही.

    या पराभवामुळे अर्जेंटिनाचा सलग ३६ सामन्यांत विजयी होण्याची मालिका खंडीत झाली आहे. अर्जेंटिनाचे आतापर्यंत खेळण्यात आलेल्या ३६ सामन्यांपैकी २५ सामन्यांत विजय मिळवला होता. तर ११ सामने ड्रॉ झाले होते. आता २७ नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचा सामना मेक्सिकोशी होईल. तर त्यानंतर ३० डिसेंबर रोजी तो पोलंडशी दोनहात करेल. सौदी अरेबियाचा विश्वचषकातील हा अवघा तिसरा विजय आहे.