धोनीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, गुडघ्याच्या दुखण्यामुळे माही मुंबईतील हॉस्पिटलमध्ये होणार दाखल

    मुंबई : आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पाच विकेटने पराभव केला. याचसह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएल जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमएस धोनीच्या गुडघ्याची दुखापत वाढली असून, तो या आठवड्यात मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर एमएस धोनीच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात येणार आहेत.

    आयपीएल 2023 चा हंगाम धोनी गुडघ्याची दुखापत घेऊन खेळला

    आयपीएल 2023 चा संपूर्ण मोसम धोनी गुडघ्याची दुखापत घेऊनच खेळला. मॅचदरम्यान अनेकवेळा धोनीच्या डाव्या गुडघ्यावर पट्ट्या बांधून खेळताना दिसला. एमएस धोनीचा आयपीएलचा हा शेवटचा मोसम असेल, असा कयास अनेकांनी बांधला होता, तसेच आयपीएल जिंकल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल, असेही बोललं गेलं.

    धोनी निवृत्ती घेणार का?

    आयपीएल फायनल जिंकल्यानंतर धोनी निवृत्ती घेणार का? असं विचारण्यात आलं, त्यावर धोनीने स्पष्ट उत्तर दिलं. ‘खरंतर निवृत्तीची घोषणा करण्याची ही योग्य वेळ आहे, पण मला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं आहे. गुडबाय म्हणणं माझ्यासाठी सगळ्यात सोपं असेल, पण पुढचे 9 महिने कठोर परिश्रम करून पुन्हा खेळायला येणे माझ्यासाठी आव्हान असेल. खेळायचं का नाही हे ठरवण्यासाठी माझ्याकडे 6-7 महिने आहेत. मी माझ्या चाहत्यांना निराश करू शकत नाही. मी आणखी एक मोसम खेळेन, पण शरीराने साथ दिली पाहिजे,’ असेही धोनीने सांगितले .