अखेर नीरजने जिंकले गोल्ड; सिल्व्हर जिंकणाऱ्या किशोरने वाढवले होते टेन्शन, भारताला मिळाले सिल्व्हर

    Neeraj Chopra Kishore Kumar Jena : एशियन गेम्स 2023 मध्ये आज पुरूष भालाफेक स्पर्धेत दोन भारतीयांनी दमदार कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या नीरज चोप्राला भारताच्याच किशोर कुमार जेनाने सुवर्णपदकासाठी कडवे आव्हान दिले. अखेर नीरज चोप्राने आपली हंगामातील 88.88 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर किशोर कुमार जेनाने देखील आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी (87.54 मीटर) करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

    87 मीटर लांब भालाफेक

    भारताच्या नीरज चोप्राने आपली सुरूवातच जवळपास 87 मीटर लांब भालाफेक करत केली होती. मात्र पंचांनी तांत्रिक कारण देत ही फेकी वैध मानली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा भालाफेक करावी लागली. त्याने पहिल्या 82.38 दुसऱ्या प्रयत्न 84.49 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले होते.

    वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

    भारताच्याच किशोर कुमार जेनाने पहिल्या प्रयत्नात 82.38, दुसऱ्या प्रयत्नात 84.49 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र त्याने तिसऱ्या प्रयत्नात 86.77 मीटर भालाफेक करत नीरजला मागं टाकलं. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.
    मात्र यानंतर नीरजने आपल्या चौथ्या प्रयत्नात 88.88 मीटर भालाफेक करत आपले अव्वल स्थान आणि सुवर्ण पदकाची दावेदारी पुन्हा मिळवली. त्यानंतर जेनाने पुन्हा एकदा कमाल केली. त्याने आपले काही मिनिटांपूर्वी केलेला वैयक्तिक सर्वोत्तम फेकीचा विक्रम मोडला. त्याने चौथ्या प्रयत्नात 87. 54 मीटर भाला फेकला.

    सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब

    पाचव्या फेकीत जेनाने फाऊल केला तर नीरजने 80.80 मीटर भाला फेकला. सहाव्या फेकीत देखील जेनाचा फाऊल झाला अन् नीरजच्या सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब झाले. नीरजने एशियन गेम्सधील आपले दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे.