द. अफ्रिकेतील पराभव नव्हे, तर हे आहे विराटच्या कॅप्टन्सी सोडण्याचे कारण, का सोडली टेस्ट टीमची कॅप्टन्सी ?

नुकताच विराटने टीम इंडियाच्या टी-२० कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला होता. तर वन डे कॅप्टन्सीवरुन त्याला हटविण्यात आले होते. त्यामुळे त्यानंतर लगेचच टेस्ट कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्याने, त्याने राजीनामा का दिला, याची चर्चा रंगली आहे.

    मुंबई : द. अफ्रिकेविरुद्ध (South Africa) टेस्ट सीरिज (Test Series) २-१ ने हरल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाचा (Team India) टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने (Test Team Captain Virat Kohli) टेस्टच्या कॅप्टन्सीला रामराम ठोकला आहे.

    नुकताच विराटने टीम इंडियाच्या टी-२० कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला होता. तर वन डे कॅप्टन्सीवरुन त्याला हटविण्यात आले होते. त्यामुळे त्यानंतर लगेचच टेस्ट कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्याने, त्याने राजीनामा का दिला, याची चर्चा रंगली आहे.

    धोनीच्या राजीनाम्यानंतर, विराट कोहलीने २०१५ साली ही कॅप्टन्सीची धुरा अंगावर घेतली होती. एका महिन्यापूर्वी विराटला वन डे कॅप्टन्सीवरुनही बीसीसीआयने हटविले होते, तर त्यापूर्वी टी-२० कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय विराटनेच जाहीर केला होता. बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे विराटने कॅप्टन्सी सोडल्य़ाची चर्चा सगळीकडे रंगते आहे.

    विराट कोहली विरुद्ध सौरभ गांगुली ?

    विराटने टेस्ट कॅप्टन्सी सोडल्याच्या दुसऱ्या दिवशी सौरभ गांगुली टॉप ट्रेंडमध्ये होते. काही फॅन्सनी विराटच्या कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णय़ाला गांगुलींना जबाबदार धरले आहे. तर काहींनी विराटच्या कथित हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी, सौरभदादांचे कौतुकही सोशल मीडियावर केले.

    या सगळ्या प्रकरणावर, गांगुली विरुद्ध कोहली या वादाचा थोडा तरी परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच याची झलक पाहायला मिळाली होती, जेव्हा बीसीसीआयने वन डेची कॅप्टन्सी विराटकडून काढून रोहित शर्माकडे दिली होती.

    वनडे कॅप्टन्सीवरुन हटविल्याने विराट नाराज?

    बीसीसीआयने विराट कोहलीला वन डे कॅप्टन्सीवरुन हटविल्याने विराच कोहली नाराज होता. त्यावेळी सौरभ गांगुली आणि विराट यांच्यातील मतभेद सार्वजनिकरित्या चव्हाट्यावर आले होते. विराटने टी-२०ची कॅप्टन्सी सोडू नये, असे आवाहन विराटला केल्याची माहिती सौरभ गांगुली यांनी दिली होती. त्याने हा निर्णय मान्य न केल्याने, त्याला वन डे कॅप्टन्सीवरुन हटविण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही गांगुलींनी त्यावेळी सांगितले होते. टी-२० आणि वन डे टीम्सना एकच कॅप्ट्न असावा, असे त्यामागचे धोरण होते. तर याबाबत बीसीसीआय़ने आपल्यासोबत कॅप्टन्सीवर कोणतीही चर्चा केले नसल्याचे सांगत, विराटने सगळ्यांना धक्का दिला होता. द. अफ्रिका दौऱ्याच्या आधी टेस्ट टीम निवडीच्या ९० मिनिटे आधी ही माहिती देण्यात आल्याचे विराटने सांगितले होते.

    विराटने टेस्टची कॅप्टन्सी सोडल्यावर, तो विराटचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सौरभ गांगुली म्हणाले होते. सर्वाधिक यशस्वी कॅप्टन म्हणून बीसीसीआयने कोहलीच्या योगदानाबद्दल आभारही मानले होते. या सगळ्या वादात नाराज झालेल्या विराटने आधीच टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घएतला होता. द. अफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया विजयी झाली असती, तरीही विराटने कॅप्टन्सी सोडलीच असती, असा दावा अनेक क्रीडा प्रेमी करीत आहेत.

    टी-२० कॅप्टन्सी सोडण्यापूर्वी विराटची बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाहा, पाचही निवड समितीचे सदस्य यांच्यासोबत मिटिंग झाल्याची माहिती आहे. या मिटिंगमध्ये रोहित शर्माही सामील होता. याच बैठकीत त्याने टी-२० कॅप्टन्सी सोडू नये असे सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी वन डेत के एल राहुल याला व्हाईस कॅप्टन् करण्याची आणि रोहितकडे टी-२०ची धुरा सोपवण्याची भूमिका विराटने मांडली होती. ती बीसीसीआयने अमान्य केली. यात विराटला वन डे कॅप्टन्सीवरुन जावे लागेल, याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. कोहलीसारख्या क्रिकेटरला हे सर्व पचविणे, त्यामुळे अवघड गेले.

    कोहली आणि गांगुली यांच्यातील मतभेद

    या सर्व प्रकरणात विराट कोहली आणि सौरभ गांगुली यांच्यातील मतभेद हे प्रमुख कारण दिसते आहे. २०१६पासून याची सुरुवात झाली. त्यावेळी गांगुली यांच्या इच्छेव्यतिरिक्त रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेंना टीम इंडियाचे कोच करण्यात आले. मात्र एका वर्षाने विराटशी मतभेदाच्या कारणामुळे कुंबळेंनी राजीनामा दिला होता.

    २०१७ सालीही गांगुलींच्या इच्छेविरुद्ध रवीशास्त्रींना कोच करण्यात आले. शास्त्री आणि गांगुली यांच्यातील संबंध चांगले नसल्याने, ही निवड गांगुलींना आवडली नव्हती.

    आता जेव्हा गांगुलींच्या हाती बीसीसीआयची सत्ता आली, रवीशास्त्री निवृत्त झाले, त्यावेळी या दोघांमधील कॅप्टन्सीवरुन वाद उघड झाले.

    या सगळ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातही मतभेदाच्या बातम्या अनेकदा येत राहिल्या. २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचे हे एक कारण होते, अशा चर्चाही रंगल्या.