VVS Laxman Profile
VVS Team New Head Coach

VVS Laxman Profile : द वॉल राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. यापुढे ही जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचे राहुल द्रविडने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे यापुढे आता टीम इंडियाला शिकवणी कोण देणार? याची चर्चा जोरदार सुरू असताना, आता ही जबाबदारी व्ही व्ही एस लक्ष्मणच्या खांद्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मणच्या कारकिर्दीचा भारतीय संघाला फायदा होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  VVS Team New Head Coach : द वॉल राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. यापुढे ही जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचे राहुल द्रविडने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलेय. त्यामुळे यापुढे आता टीम इंडियाला शिकवणी कोण देणार? याची चर्चा जोरदार सुरु आहे. भारताचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण याचे नाव सध्या सर्वात पुढे आहे.लक्ष्मण सध्या एनसीएचा (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) प्रमुख म्हणून काम पाहतोय. त्याशिवाय त्याने राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुराही संभाळली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात पाच सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी लक्ष्मणचं युवा टीम इंडियाला शिकवणी देत आहे.

  प्रशिक्षकपदाची धुरा लक्ष्मण संभाळण्याची शक्यता दाट

  राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा लक्ष्मण संभाळण्याची शक्यता दाट आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय व्हीव्हीएस लक्ष्मण यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होऊ शकते. लक्ष्मणने कसोटीमध्ये अनेकदा टीम इंडियाला अशक्य असा विजय मिळवून दिलाय. कोलकाता कसोटीत लक्ष्मण याची खेळी भारताच्या क्रिकेटमध्ये अजरामर झाली आहे. लक्ष्मणचं खासगी आयुष्यही बरेच रंजक आहे. 1992 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटला सुरुवात करणारा लक्ष्मण आज बीसीसीआयचा प्रशिक्षक होणार आहे. इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोप नव्हता. पाहूयात व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणबद्दल…

  डॉक्टर झाला क्रिकेटर….
  वंगीपुरप्पू व्यंकट साई लक्ष्मण हे त्याचं पूर्ण नाव आहे. एक नोव्हेंबर 1974 रोजी आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये त्याचा जन्म झाला. लक्ष्मणचे आई आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत. लक्ष्मणनेही मेडिकलचे शिक्षण केलेय. पण त्यानंतर डॉक्टरी सोडून क्रिकेटमध्ये नशीब अजमावले. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाज लक्ष्मणचे पणजोबा आहेत. लक्ष्मण याने भारतासाठी अनेक शानदार इनिंग खेळल्या पण त्याला एकही विश्वचषकाचा सामना खेळता आला नाही, हे दुर्देवच…
  व्हीव्हीएस लक्ष्मणची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
  व्हीव्हीएस लक्ष्मण भारताच्या फॅब 4 चा सदस्य होता. त्यावेळी त्यांच्या फलंदाजीचा जगभरात दरारा होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या चौकडीच्या बळावर दोन हजारच्या दशकात भारताने अनेक कसोटीत विजय मिळवलाय. 1996 मध्ये भारतासाठी कसोटी आणि 1998 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लक्ष्मणने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 1992 मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या व्हीव्हीएसची कारकीर्द शानदार राहिली. व्हीव्हीएस लक्ष्मणनं 134 कसोटी आणि 86 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर 8 हजार 781 धावांची नोंद आहे. ज्यात 17 शतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा शतकांच्या मदतीनं 2 हजार 338 धावा केल्या आहेत. व्हीव्हीएल लक्ष्मण प्रथम श्रेणी सामन्यातील पदार्पणात शून्यावर बाद झाला होता. पहिला एकदिवसीय सामन्यातही त्याला खाते उघडता आले नव्हते. क्रिरिकेटमधील अभूतपूर्व योगदानासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  व्हेरी व्हेरी स्पेशल नावामागील स्टोरी काय?
  आस्ट्रेलिया संघांविरुद्ध लक्ष्मण कर्दनकाळच ठरला. प्रत्येक कांगारू गोलंदाजाला लक्ष्मणने जेरीस आणले होते. 2001 मध्ये ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली 281 धावांची त्याची संस्मरणीय इनिंग आजही अनेकांची आवडती इनिंग आहे. भारताने फॉलोऑन खेळून सामना जिंकला होता. इतिहासात या खेळीची नोंद झाली आहे. लक्ष्मणने आपल्या सर्वात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध नेहमीच व्हेरी व्हेरी स्पेशल खेळ केला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने त्याला व्हेरी व्हेरी स्पेशल हे नाव दिले होते…
  वैवाहिक आयुष्य –
  2004 मध्ये लक्ष्मणचे लग्न जीआर शैलजा यांच्याशी झाले. त्यांना एक मुलगा आणि एका मुलगी आहे. लक्ष्मण आणि शैलजा यांची भेट घरच्यांनी घडवून आणली होती. निवृत्तीनंतर व्हीव्हीएस लक्ष्मणने दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर मोकळेपणाने उत्तरे दिली होती. त्यावेळी त्याने सांगितले की, शैलजासोबतची पहिली भेट कुटुंबीयांच्या इच्छेनुसार झाली होती. शैलजा खूप प्रतिभावान आहे आणि तिला हवे असते तर ती आयटी आणि सॉफ्टवेअरच्या जगात मोठे स्थान मिळवू शकली असती. पण लग्नानंतर तिने कुटुंबासाठी वेळ दिला.
  द्रविडसारखे अपडेट न केल्याची खंत –
  व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी जवळपास एकत्रच आंतरराष्ट्रीय करिअर सुरु केले होते. दोघांनी कसोटीत अनेकदा ऐतिहासिक आणि संस्मरणीय भागिदारी केली. दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे. वनडे विश्वचषकात खेळू न शकल्याची खंत लक्ष्मणच्या मनात आहे. एका मुलाखतीत लक्ष्मणला वनडेमध्ये करियर मोठं का राहिले नाही.. हा प्रश्न विचारला होता. त्यावर तो म्हणाला की, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंहसारखे स्फोटक फलंदाज जेव्हा संघात आले, तेव्हा संघात स्थान मिळवणे खूप कठीण झाले. वेगवान फलंदाजी करण्याचा खूप प्रयत्न केला पण मला यश आले नाही. त्यामुळे वनडे संघात स्थान मिळवणे माझ्यासाठी कठीण झाले. राहुल द्रविड सुरुवातीला माझ्यापेक्षाही हळू फलंदाजी करायचा. पण त्याने त्याच्या फलंदाजीची शैली वेळोवेळी कमालीची बदलली. त्याने स्वत:ला अपडेट केले. कारण त्याला एकदिवसीय क्रिकेट देखील खेळायचे होते. त्यामुळे तो दीर्घकाळ एकदिवसीय संघात खेळला. पण मी स्वत:ला अपडेट केले नाही. याची खंत मला कायमस्वरुपी राहील.
  VVS Laxman Net Worth 2023 व्हीव्हीएस लक्ष्मणची कमाई
  व्हीव्हीएस लक्ष्मणची सर्वाधिक कमाई क्रिकेटमधून झाली आहे. निवृत्तीआधी कारकिर्दीच्या एका टप्प्यावर तो पेप्सी सारख्या ब्रँडचा पोस्टर बॉय राहिलाय. लक्ष्मणची सध्याची एकूण संपत्ती सुमारे 100 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. समालोचक, मार्गदर्शक आणि क्रिकेट सल्लागार समिती सदस्य म्हणून लक्ष्मणची कमाई होते.