पुण्यातील सिंपल स्टेप्स फिटनेसच्या वतीने मिशन ‘लो टू हाय रन’ या सामूहिक उपक्रमाचे आयोजन; भारतीय स्वातंत्र्याचे 76 वर्षे साजरे करण्याचे मानस

पुण्यातील सिंपल स्टेप्स फिटनेसच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षानिमित्त नागरिकांना वैयक्तिकरित्या तंदुरुस्ती व आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील सर्वात कमी उंचीच्या ठिकाणापासून सर्वोच्च ठिकाणापर्यंत सामुहिकरित्या एकूण 76 लाख किलोमीटर अंतर 76 दिवसांत पार करून भारतीय स्वातंत्र्याचे 76 वर्ष साजरे करणार आहे.

  पुणे : पुण्यातील सिंपल स्टेप्स फिटनेसच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्षानिमित्त नागरिकांना वैयक्तिकरित्या तंदुरुस्ती व आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता आणि त्यांच्या वैयक्तिक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी ‘मिशन लो टू हाय’ या विशेष रनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे सामूहिकरित्या 76 दिवसांत 76 लाख किलोमीटर अंतर पार करण्याचा संकल्प आहे. आज याचे रजिस्ट्रेशन अनावरण पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत झाले.

  केरळमधील कुत्तनाङ येथून सुरुवात

  या आगळ्यावेगळ्या रनचे नेतृत्व गिनीज विक्रमवीर व अल्ट्रा रनर आशिष कसोदेकर करणार असून, केरळमधील कुत्तनाङ (समुद्रसपाटीपासून 2 मीटर) या भारतातील सर्वात कमी उंचीच्या ठिकाणापासून सुरुवात करून लडाखमधील उमलिंग ला या (समुद्रसपाटीपासून 5089मीटर) या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या मोटर रोड येथे या मोहिमेची सांगता होणार आहे. 60 दिवसांत 60 पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या कसोदेकर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत 4000 किलोमीटर अंतर पार करण्यात येणार आहे.

  सिंपल स्टेप्स फिटनेसचे संस्थापक 

  आशिष कसोदेकर हे सिंपल स्टेप्स फिटनेसचे संस्थापक असून, लडाखमधील ला अल्ट्रा ही जगातील सर्वात खडतर अशी 555 किलोमीटरची धाव पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय धावपटू आहेत. तसेच, कॅलिफोर्नियातील बड वॉटर अल्ट्रा बेस व्हॅल्यू ही जगातील अत्यंत अवघड शर्यत पूर्ण करणारे त्याचप्रमाणे ब्राझील 135 अल्ट्रा ट्रेल, एव्हरेस्ट गॅरेथॉन, तसेच अनेक अवघड शर्यती पूर्ण करणारे धावपटू म्हणून त्यांचा लौकिक आहे. अनेक प्रमुख शर्यतीचे ते ब्रँड अॅम्बेसेडरही होते.

  केरळमधील कुतनाड येथून होणार सुरुवात
  लो टू हाय उपक्रमाची सुरुवात 1 जून रोजी केरळमधील कुतनाड येथे होणार असून 76 दिवसांत 10 राज्यांमधून 4000 किलोमीटर अंतर पार करुन कसोदेकार लडाख येथे 15 ऑगस्ट 2023 रोजी पोहोचणार आहेत. या विशेष उपक्रमाचा मार्ग केरळमधील कोची कर्नाटकमधील हुबळी, महाराष्ट्रातील पुणे व मुंबई, गुजरातमधील सुरत व अहमदाबाद, राजस्थानमधील उदयपूर व जयपूर, हरियाणातील गुरुग्राम, हिमाचलमधील मनाली या प्रमुख शहरांमधून जातो.
  पत्रकार परिषदेत याविषयी बोलताना आशिष कसोदेकर म्हणाले की, जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्तीच्या उपक्रमासाठी प्रोत्साहन देणे आणि व्यायाम करण्याचा संदेश व आरोग्य पूर्ण जीवनशैलीचा मार्ग अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

  एकूण 76 लाख किलोमीटरचे लक्ष्य

  याचबरोबर सर्व नागरिकांनी स्वतः यात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे कसोदेकर यांनी सांगितले. या उपक्रमासाठी www.low2high.in या संकेस्थळावर नावनोंदणी करावी लागणार असून धावणे, चालणे व गिर्यारोहण यातील सुमारे 20000 धावपटू तसेच सुमारे 2000 हून अधिक सायकलपटू यांच्या सहभागातून एकूण 76 लाख किलोमीटरचे लक्ष्य आम्ही निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास आहे.

   

  नागरिकांना विविध माध्यमांतून यात सामील होण्याचे आवाहन
  सर्व धावपटू मिळून एकूण 76 लाख किलोमीटर अंतर पार करण्याचे आमचे लक्ष्य असून, यासाठी सर्व फिटनेस ग्रुप, कॉर्पोरेट, ऍल्यूमनी ग्रुप्स, तसेच सामाजिक संस्था यांसह देशभरातील सर्व गटातील नागरिकांना धावणे, चालणे सायकलिंग, गिर्यारोहण अशा विविध माध्यमांतून यात सामील होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.

  नावनोंदणी मोफत असून ट्रॅकिंगसाठी उपकरणही विनामूल्य
  य अभिनव अशा तंदुरुस्ती मोहिमेत सहभागी होऊन आपले वैयक्तिक लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही नागरिकांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊ इच्छितो. यासाठी नावनोंदणी मोफत असून ट्रॅकिंगसाठी उपकरणही विनामूल्य दिली जाणार आहेत. तसेच या उपक्रमासाठी ऑनलाईन लीडर बोर्ड, तयार करण्याचीही आमची योजना आहे, असे कसोदेकर यांनी सांगितले.