पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता मीराबाई चानूचा फॅन

    बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या वेटलिफ्टर्स खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. मात्र स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताला पुरुष १०९+ वजनी गटात कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. परंतु याच वजनी गटात पाकिस्तानच्या २४ वर्षीय नूह दस्तगीर बट्ट (Noah Dastagir Butt) या खेळाडूने एकूण ४०५ किलो वजन उचलून आपल्या देशासाठी सुवर्णपदक पटकावले. पाकिस्तानचा वेटलिफ्टर हा भारतीय खेळाडू मीराबाई चानूचा (Mirabai Chanu) मोठा फॅन असून त्याने मीराबाई चानू ही, आमची “प्रेरणास्रोत” असल्याचे म्हंटले आहे.

    पाकिस्तानच्या २४ वर्षाच्या नूहने राष्ट्रकुल स्पर्धेत स्नॅच प्रकारात १७३ किलो वजन उचलले. तर क्लीन अँड जर्क प्रकारात त्याने २३२ किलो वजन उचलून विक्रम केला. त्याने एकूण ४०५ किलो वजन उचलून सुवर्ण पदक आपल्या नावावर केली. त्याने या वयोगटातील तीनही रेकॉर्ड एका झटक्यात मोडीत काढले. नूहने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, ‘ज्यावेळी मीराबाई चानूने माझे अभिनंदन केले आणि माझ्या कामगिरीचे कौतुक केले तो क्षण माझ्यासाठी खूप गौरवशाली क्षण होता.’

    तीनही विक्रम मोडणाऱ्या नूहने भारतीय स्टार वेटलिफ्टर मीराबाईकबद्दल गौरवउद्गार काढत म्हंटले की, ‘आम्ही मीराबाईकडे आमचा प्रेरणास्त्रोत म्हणून पाहतो. त्यांनी आम्हाला दाखवून दिले की दक्षिण आशियाई खेळाडू देखील ऑलिम्पिक पदक जिंकू शकतात. ज्यावेळी त्यांनी टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकले होते त्यावेळी आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटला होता.’

    तसेच नूह १०९+ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकणाऱ्या गुरदीप बद्दल म्हणाला, ‘मी एका भारतीय वेटलिफ्टरबरोबर स्पर्धा करत होतो असं नाही. मी फक्त माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होतो.’ नूह बटने २ आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचा दौरा केला आहे. त्याने पहिली स्पर्धा २०१५ मध्ये पुण्यात, दुसरी गुवाहाटी मधील स्पर्धा खेळण्यासाठी तो भारतात आला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘मी दोन वेळा भारताचा दौरा केला आहे. मला तिथे जसे समर्थन मिळाले मी ते कधीही विसरू शकत नाही. मी पुन्हा एकदा भारतात जावू इच्छितो. मला असे वाटते की माझे पाकिस्तानपेक्षा जास्त चाहते भारतात आहेत. ‘