पाकिस्तानी खेळाडूला मैदानावर नमाज अदा करणे पडणार महागात; ICC कडे तक्रार दाखल

    World Cup 2023 : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खरं तर, पाकिस्तान-नेदरलँड सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा केली होती. आता याविरोधात आयसीसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    रिझवान विरोधात आयसीसीकडे तक्रार

    सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी मोहम्मद रिझवान विरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. विनीत जिंदाल यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, मोहम्मद रिजवानने मैदानावर नमाज अदा करणे हे खेळाच्या विरोधात आहे.

    कोण आहेत सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल?

    सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदालही अलीकडेच चर्चेत होते. विनीत जिंदाल यांनी पाकिस्तानी अँकर झैन अब्बास यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी विनीत जिंदाल म्हणाले होते की, झैन अब्बास यांनी आपल्या ट्विटने भारतीय आणि हिंदू धर्माला दुखावले आहे. यानंतर झैन अब्बासला भारत सोडावा लागला होता.

    मात्र, मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी मोहम्मद रिजवाननेही मैदानावर नमाज अदा केली होती.

    मोहम्मद रिझवानच्या गाझा ट्विटवर आयसीसी काय म्हणाली?

    नुकतेच मोहम्मद रिझवानने गाझाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. त्यानंतर हे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले. मात्र, आयसीसीने कोणतीही कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला. आयसीसीने म्हटले आहे की, एखादा खेळाडू मैदानाबाहेर काय करतो याच्याशी आमचे काही घेणे-देणे नाही. हा मुद्दा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंडर येतो, असेही आयसीसीने म्हटले आहे.