ICC World Cup 2023 Pakistan vs South Africa
ICC World Cup 2023 Pakistan vs South Africa

    PAK vs SA : पाकिस्तानच्या वर्ल्ड कपमधील अत्यंत खराब परफॉर्मन्सवर त्यांच्या संघावर मायदेशातून तुफान टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफने एका लाईव्ह कार्यक्रमात अनेक गौप्यस्फोट करीत खळबळ उडवून दिली. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना जवळापस पाच महिने पगारदेखील मिळाला नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर कर्णधार बाबरच्या मेसेजला पीसीबी चेअरमनकडून कोणताही रिप्लाय दिला जात नाही. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

    दक्षिण अफ्रिकेकडून पराभव

    दक्षिण आफ्रिकेने वर्ल्डकप इतिहासातील आपला पहिला थ्रिलर सामना शेवटपर्यंत तडीस नेत जिंकला. पाकिस्तानने 271 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना आफ्रिकेने 9 फलंदाज गमावले. पाकिस्तानचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग चौथा पराभव आहे. पाकिस्तानने वर्ल्डकपमधून जवळपास गाशा गुंडाळला आहे.

    पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून खळबळजनक खुलासे

    राशिद लतिफ पीटीव्ही स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, बाबर आझम पीसीबी चेअरमनला मेसेज करतोय मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीये. त्याने पीसीबी सीओओ सलमान नासीर यांनादेखील मेसेज केला आहे. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिलेला नाही.

    पीसीबीकडून कर्णधाराच्या मेसेजला कोणताही प्रतिसाद नाही

    ‘कर्णधाराच्या मेसेजला प्रतिसाद न देण्याचं कारण काय? त्यानंतर तुम्ही एक प्रेस नोट रिलीज करता. तुम्ही केंद्रीय करार नव्याने करण्याचीही भाषा करताय. गेल्या पाच महिन्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंना पगार मिळालेला नाही. खेळाडू तुमचं ऐकतील का?’

    लतिफने हे वक्तव्य ज्यावेळी खेळाडू पीसीबीकडून कमी समर्थन मिळत असल्याने खूश नाहीत अशी बातमी आल्यानंतर केले. यापूर्वी, पीसीबीने जर संघ वर्ल्डकपमधून साखळी फेरीतच बाहेर पडला बाबर आझमचे कर्णधारपद जाणार असे संकेत दिले आहे.