पंतप्रधान मोदींच्या खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममधील एंट्रीवरून रवी शास्त्रींचे परखड मत; म्हणाले, ‘पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये जाणे हे काही….’

Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुमला भेट देत खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता. यावरून क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी टिप्पणी केली होती. आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावर परखड मत मांडले आहे.

  Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit : वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.

  ऑस्ट्रेलिया बनली होती विश्वचॅम्पियन
  ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले. या खेळाडूंना धीर देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु असून राजकीय वादही निर्माण झाला आहे. अशातच संघाचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी मोदींच्या या ड्रेसिंग रुमभेटीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

  थेट देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रुममध्ये येतात तेव्हा…
  एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रवी शास्त्री यांनी मोदींच्या या भेटीबद्दल आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. “मी ड्रेसिंग रुममध्ये एक क्रिकेटपटू म्हणून आणि त्यानंतर अनेक वर्ष एक प्रशिक्षक म्हणून वावरलो आहे. अशावेळेस (मोठ्या सामन्यात पराभव होतो तेव्हा) फार वाईट वाटतं. एवढ्या शेवटापर्यंत पोहचून पराभव होतो तेव्हा पराभव जिव्हारी लागतो. मात्र तुम्हाला वाईट वाटत असताना थेट देशाचे पंतप्रधान तुमच्या ड्रेसिंग रुममध्ये येतात तेव्हा तो क्षण फार मोठा असतो,” असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.
  हे सामान्य व्यक्तीने जाण्यासारखं नसतं…
  “पंतप्रधान ड्रेसिंग रुममध्ये आल्याने खेळाडूंमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. कारण पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाणं हे काही सर्वसामान्य व्यक्तीने तिथं जाण्यासारखी गोष्ट नाही. मला ठाऊक आहे की पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर खेळाडूंना कसं वाटलं असेल. मी भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना हे दृष्य यापूर्वी पाहिलं आहे,” असंही रवी शास्त्री म्हणाले.