Ravindra Jadeja gets big award from CSK's team management; Honored with the name 'Cricket Thalapathy', read more

CSK vs KKR Match : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सने यांच्यात काल झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने दमदार  गोलंदाजीच्या जोरावर केकेआरला रोखून धरले. अखेर सीएसकेने 7 गडी राखून विजय प्राप्त केला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने जडेजाबाबत एक खास घोषणा केली आहे.

  Ravindra Jadeja Nickname : चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी (7 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. यामध्ये चेन्नईची दर्जेदार गोलंदाजी कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. रवींद्र जडेजाने उत्तम गोलंदाजी करीत 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन फक्त 18 धावा दिल्या त्यामुळे सामनावीराचा किताब जड्डूला मिळाला. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने त्याला आणखी एका मोठ्या बहुमानाने संबोधित केले. वाचा यावरील सविस्तर माहिती……..
  जडेजाने एक खंत बोलून दाखवली
  एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.दरम्यान, सामन्यानंतर जडेजाने एक खंत बोलून दाखवली होती, ज्यावर आता चेन्नई सुपर किंग्सने त्याची ही खंत दूर केली आहे. खरंतर चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या काही खेळाडूंना टोपन नाव दिले आहे.

  सुरेश रैनाला ‘चिन्ना थाला’ असे टोपन नाव
  धोनीला तर गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईच्या चाहत्यांनी थाला या नावाने प्रेमाने स्विकारले आहे. त्यामुळे अनेकदा धोनीला ‘थाला’ या टोपन नावानेही संबोधले जाते. धोनीप्रमाणेच चेन्नईचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ‘चिन्ना थाला’ असे टोपन नाव देण्यात आले आहे, तर कर्णधार ऋतुराजला ‘रॉकेट राजा’ म्हटलं जातं.
  ‘क्रिकेट थालापथी’ हे नावही सुचवले
  त्याचप्रमाणे जडेजालाही असं काही नाव मिळालं आहे का, याबद्दल त्याला सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेझेंटेटर हर्षा भोगले यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी ‘क्रिकेट थालापथी’ हे नावही सुचवले. त्यावर जडेजा म्हणाला होता की ‘माझं नाव अद्याप कोणी व्हेरिफाय केलेलं नाही, आशा आहे की ते मला असं कोणतंतरी नाव देतील.’
  ‘क्रिकेट थालापथी म्हणून व्हेरिफाईड’
  जडेजाने ही खंत बोलून दाखवल्यानंतर मात्र लगेचच काही वेळात चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट करत बोल्ड अक्षरात लिहिले की ‘क्रिकेट थालापथी म्हणून व्हेरिफाईड’. थोडक्यात आता जडेजाला जड्डू, बापू आणि सर नंतर आता चेन्नईच्या चाहत्यांकडून थालापथी हे नवे टोपननाव मिळाले आहे. त्यामुळे सध्या त्याची चर्चा सुरू आहे.
  थालापथी म्हणजे काय?
  खरंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये थालापथी अभिनेता विजयला म्हटले जाते. त्याला त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांमुळे ही ओळख मिळाली होती. पण आता क्रिकेटमध्ये जडेजालाही हे टोपननाव मिळाले आहे. थालापथीचा अर्थ होतो कमांडर किंवा सेनापती. धोनीला थाला म्हटले जाते, ज्याचा अर्थ नेता असा होतो, तर रैनाला चिन्ना थाला म्हटले जाते, ज्याचा अर्थ उपनेता किंवा नेत्याच्या उजवा हात समजला जाणारा व्यक्ती.
  जडेजाची कामगिरी
  दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात जडेजाने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर या तिघांच्या विकेट्स घेतल्या तसेच त्याने फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यर यांचे झेलही घेतले.
  या सामन्यात कोलकाताचा संघाला 20 षटकात 9 बाद 137 धावाच करता आल्या. त्यानंतर चेन्नईने 17.4 षटकात 3 विकेट्स गमावत 138 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराजने नाबाद 67 धावांची खेळी केली.