रॉबिन उथप्पाला मुंबई इंडियन्सने जबरदस्तीने काढले संघातून बाहेर, ‘धमकी’ दिली आणि ट्रान्सफर पेपरवर करून घेतली सही

मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. मात्र आता या संघावरही मोठे आरोप झाले आहेत. खरंतर मुंबईच्या संघाने एका खेळाडूला जबरदस्तीने संघातून हाकलून दिले होते.

    नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र याचदरम्यान रॉबिन अथप्पाने मुंबई इंडियन्समधील खेळाडूंच्या निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे. उथप्पाने मुंबई संघावर जाहीरपणे मोठे आरोप केले आहेत आणि या संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचेही सांगितले आहे.

    सीएसकेकडून सलामीची जबाबदारी स्वीकारणारा महान भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाने मुंबई इंडियन्सवर मोठे आरोप केले आहेत. उथप्पाने सांगितले की, २००८ मध्ये जेव्हा तो मुंबई इंडियन्सकडून खेळायचा तेव्हा त्याची जबरदस्तीने आरसीबीमध्ये बदली करण्यात आली होती. उथप्पाने खुलासा केला की त्याला मुंबईतून आरसीबी संघात जायचे नव्हते, परंतु त्यावेळी ट्रान्सफर पेपरवर सही करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

    रॉबिन उथप्पाने रविचंद्रन अश्विनसोबत वाहिनीवर बोलताना या गोष्टींचा खुलासा केला. उथप्पा म्हणाला, ‘मला ट्रान्सफर पेपरवर सही करायची नव्हती. मुंबई इंडियन्सच्या एका व्यक्तीने मला सांगितले की जर मी ट्रान्सफर पेपरवर सही केली नाही तर मला मुंबईच्या प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. तो पुढे म्हणाला, ‘मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात तणावातून जात होतो. RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्ण नैराश्यात होतो. त्या मोसमात मी एकही सामना चांगला खेळला नाही.

    मुंबई ५ वेळा चॅम्पियन आहे

    आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव येते. मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटले जाते. या संघाने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. संघ व्यवस्थापनाचा खेळाडूंवर असलेला विश्वास हे या संघाच्या यशाचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. पण आता उथप्पाने ज्या पद्धतीने व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत ते आश्चर्यकारक आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.