रोहित शर्माचा मोठा विक्रम; आंतरराष्ट्रीय सामन्यात ठोकले ५०० षटकार

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात रोहित शर्मानं नाबाद 51 धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह रोहित शर्मानं आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 षटकारांचा टप्पा ओलांडला.

    मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात बांगलादेशने २-० अशी आघाडी घेतली आहे. बुधवारी बांगलादेश विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभवाची चव चाखायला लागली. शेवटच्या काही षटकातमध्ये कर्णधार रोहित शर्माने विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली. परंतु भारताला या सामन्यात विजय मिळाला नसला तरी कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला आहे.

    ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 266 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यातील अखेरच्या काही षटकात दुखापतग्रस्त रोहित शर्माने सामन्याचं रुप बदलण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात रोहित शर्मानं नाबाद 51 धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह रोहित शर्मानं आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 षटकारांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय आणि जगभरातील दुसरा खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर 500 हून अधिक षटकारांची नोंद आहे.

    आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 553 षटकारांची नोंद आहे. 502 षटकारांसह रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या यादीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीद आफ्रिदीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 476 षटकार लगावले आहे. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम 398 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, मार्टिन गप्टील 383 षटकार पाचव्या क्रमांकावर आहे.