इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर

    टी २० विश्वचषक स्पर्धेतील सेमी फायनल सामन्यात भारताचा झालेला पराभव हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये असणारा भारतीय संघ मात्र इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामन्यात कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे भारताचाय फायनल गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फेरत इंग्लंडने १० विकेट्सने विजय मिळवून फायनल मध्ये प्रवेश केला. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माचा डगआऊटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंसोबत हात मिळवून डगआऊटमध्ये पोहोचले, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसला. दोघांमध्ये थोडावेळ चर्चा झाली. त्यानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाली. त्यावेळ राहुल द्रविडनं त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.