पालघरचा रुद्राक्ष पाटीलची भारतीय संघात निवड, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

    पालघर : पालघरचा (Palghar) सुपुत्र रुद्राक्ष पाटील याने (Rudraksh Patil) ऑलिम्पियन ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर हिला १६- ६ च्या फरकाने मात देत एमपी स्टेट नेमबाजी अकादमी श्रेणीतील १० मीटर एअर रायफल टी ६ राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी जिंकली आहे. रुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी आठ जणांच्या उपांत्य फेरीत अनुक्रमे २६१.९ आणि २६१. ३ गुणांसह पहिले आणि दुसरे स्थान पटकावले. त्यापूर्वी, ३९२ -मजबूत पात्रता झोनमध्ये, रुद्राक्षने ६३०. २ गुण मिळवून एअर आर्मीच्या रवी कुमारच्या मागोमाग दुसरे स्थान पटकावले. रवीने ६३०. ७ गुणांनी फेरी जिंकली तर ऐश्वर्या यावेळी ६२९. ४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.

    राजस्थानच्या यशवर्धननेही कमाल कामगिरी केली. रुद्राक्ष पाठोपाठ त्यानेही चमकदार खेळ दाखवला. ज्युनियर पुरुष आणि युवा पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल टी ६ चाचणी यशवर्धनने जिंकल्या. ज्युनियर पुरुष स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने रुद्राक्षचा १७-७ सा पराभव केला, तर युवा वर्गात त्याने आंध्रप्रदेशच्या मद्दिनी उमामहेशचा १७- १५ असा पराभव केला. दिल्लीतील डॉ. करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये, हरियाणाच्या कशिश मेहराने पुरुषांच्या २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल टी ५ ट्रायलमध्ये एकूण ५८७ गुणांसह विजय मिळवला.

    रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा धाकटा मुलगा असून त्याने याआधी देखील १० मीटर रायफल शूटिंग या प्रकारात उत्तम कामगिरी केली आहे. १० मीटर रायफल शूटिंगमध्ये रुद्राक्षची भारतीय संघात निवड झाली असून रुद्राक्ष लवकरच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.