आजही सचिन तेंडुलकरचा फॉर्म कायम! २० चेंडूत ठोकल्या ४० धावा

    डेहरादून : भारतात सुप्रसिद्ध अशी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज (Road Safety World Series) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) करत असून इंडिया लेजेंड्स हा भारताचा संघ आहे. या संघाने काल गुरुवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सचा ४० धावांनी पराभव केला. डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचा सामना खेळवण्यात आला./ यात इंडिया लेजेंड्सने १५ षटकांत पाच गडी गमावून १७० धावा केल्या. यानंतर इंग्लंड लीजेंड्स संघाला सहा विकेट्स गमावून केवळ १३० धाव करता आल्या.

    डेहराडूनमध्ये पावसाचा व्यत्यय असल्याने सामना १५-१५ षटकांचा खेळवण्यात आला होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या या १४ व्या सामन्यात इंडिया लीजेंड्सची कामगिरी पाहण्यासारखी होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तुफानी खेळी करत २० चेंडूवर ४० धावा केल्या. यात तीन चौकार आणि अनेक षटकार यांचा समावेश होता. ४९ व्या वर्षी देखील क्रिकेट मधील सचिनचा हा फॉर्म पाहून चाहते आश्चर्य चकित झाले.

    डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात करत ५. ३ षटकात ६५ धावा केल्या. सचिन आणि यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ओझाला पॅरीने बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. सचिन आणि युवीशिवाय युसूफ पठाणनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने ११ चेंडूत १ चौकार आणि तीन षटकारांसह २७ धावा केल्या. भारताने निर्धारित १५ षटकांत ५ गडी गमावून १७० धावा केल्या.

    लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १५ षटकांत ६ गडी गमावून केवळ १३० धावा करू शकला. यादरम्यान फिल मस्टर्डने सर्वाधिक २९ धावांची खेळी खेळली, तर राजेश पवारने तीन षटकांत १२ धावा देत भारताकडून सर्वाधिक तीन बळी घेतले. या विजयासह भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.