सचिन तेंडुलकरने जिंकली चिमुकल्यांनी मने

    क्रिकेट विश्वात क्रिकेटचा देव अशी ख्याती असणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) २४ वर्षे मैदानावरील आपल्या खेळाने लाखो भारतीयांची मने जिंकली. २०१३ मध्ये सचिनने क्रिकेट मधून निवृत्त घेतली असली तरी तो त्याच्या सामाजिक कार्याने आजही लोकांचे मन जिंकत आहे. अशाच प्रकारे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ च्या सामन्यातही सचिनने आपल्या छोट्या चाहत्यांना खुश केले.

    रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ (Road Safety World Series 2022 ) मध्ये इंडिया लिजेंड्सकडून खेळत असताना पाहायला मिळाले आहे.काल रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मधील सचिन कर्णधार असलेल्या भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड लीजेंड्स विरुद्ध इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामना पाहण्यासाठी मध्य प्रदेशातील सेहोर जिल्ह्यातील ५५ आदिवासी मुलांना सचिन तेंडुलकर फाउंडेशन (एसटीएफ) या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने हे निमंत्रण देण्यात आले होते. प्रसिद्धीपत्रकानुसार ५५ आदिवासी मुले त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली होती. यावेळी सर्व लहान मुलांनी क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला. तसेच त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिनला देखील प्रत्यक्ष खेळताना पहिले.

    इंडिया लीजेंड्सचा कर्णधार म्हणून सामने खेळण्यासाठी होळकर स्टेडियमच्या मैदानावर जाण्यापूर्वी सचिनने या मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्या जीवनातील काही तत्त्वांवर चर्चा केली. तेंडुलकर मुलांना म्हणाले, ‘आयुष्य आव्हानांनी भरलेले आहे, पण जो व्यक्ती जीवनातील सर्व आव्हानांवर मार्ग शोधतो, तोच खरा विजेता असतो.’ STF च्या माध्यमातून, तेंडुलकर मध्य प्रदेशातील दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या भल्यासाठी विनायक लोहानी यांच्या फॅमिली फाऊंडेशन सोबत काम करत आहेत.