स्क्वाशमध्ये सौरवची कांस्य पदकाला गवसणी

    राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू पदकांची कमाई करत देशाची मान अभिमानाने उंचावत आहे. अशातच बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वाशमध्ये भारताच्या खात्यात अजून एक कांस्यपदकाची भर पडली आहे. भारताचा खेळाडू सौरव घोसालने (Saurav Ghosal) स्क्वाशमध्ये कांस्यपदक (Bronze medal) पटकावले आहे. सौरभने भारताला स्क्वाशमध्ये राष्ट्रकुलमधील पहिले पदक जिंकून दिले आहे.

    सौरव घोसालने इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रॉपचा ३-० असा पराभव केला. सौरवने जेम्स विरूद्धचा पहिला गेम ११-६ असा सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही सौरवने आपला दबदबा कायम राखत गेम ११-१अशा मोठ्या फरकाने जिंकत २-० अशी आघाडी घेतली. मॅच गेममध्ये त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत गेम ११-४ असा जिंकला. विशेष म्हणजे जेम्स हा कधी काळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता, मात्र त्याचा सौरवने दारूण पराभव करत इतिहास रचला आहे.

    सौरव घोसालने स्क्वाशमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ट्विट केले की, ‘सौरव घोसालला यशाची नवी शिखरे पार करताना पाहून आनंद झाला. त्याने बर्मिंगहममध्ये जिंकलेले कांस्य पदक खास आहे. या पदकासाठी त्याचे अभिनंदन. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय तरूणांमध्ये स्क्वाश खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत मिळेल.’