शफाली वर्माचे झुझांर अर्धशतक; मलेशियाला हरवत भारताची उपांत्य फेरीत धडक 

दोन चेंडू पडल्यानंतर सुरु झालेला पाऊस थांबला नाही. मलेशियासमोर DLS नुसार विजयासाठी १५ षटकांत १७७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. पण, पावसाने पुन्हा खोडा घातला अन् भारताला विजयी घोषित करण्यात आले.

    मुंबई : एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट (Women Cricket Team) संघाने दमदार कामगिरी करत थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात सामना झाला. पण याचा पावसाने खोडा घातल्यामुळं डकवर्थ लुईस नियमांनुसार हा सामना भारताने जिंकला. हा सामना जिंकत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना १५-१५ षटकांचा करण्यात आला. (shafali verma half century india beat malaysia to enter the semi finals)

    भारताची दमदार सुरुवात…

    भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात १७३ धावांचा डोंगर उभारला होता. भारताची सलामीवीर शफाली वर्माने झुझांर अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. तिने ३९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली, त्यात तिने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. कर्णधार स्मृती मंधांनाने १६ चेंडूत २७ धावा केल्या, त्यात तिने ५ चौकार मारले. दोघांमध्ये ५७ धावांची शानदार अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर विकेटकीपर जेमिमाह रॉड्रिग्जने २९ चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी केली, त्यात तिने ६ चौकार मारले. तिला रिचा घोषने ७ चेंडूत २१ धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळं भारताला १५ षटकात १७३ धावांची मजल मारता आली.

    DLS नुसार भारत विजयी…

    मलेशियाच्या फलंदाजीवेळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. दोन चेंडू पडल्यानंतर सुरु झालेला पाऊस थांबला नाही. मलेशियासमोर DLS नुसार विजयासाठी १५ षटकांत १७७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. पण, पावसाने पुन्हा खोडा घातला अन् भारताला विजयी घोषित करण्यात आले. मलेशियाने केवळ २ चेंडूंचा सामना केला अन् १ धावा केली होती. मलेशियापेक्षा टीम इंडियाचे मानांकन अव्वल असल्याने त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला. त्यांना बांगलादेशचा सामना करावा लागू शकतो.

    भारत: स्मृती मंधांना (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, कनिका आहुजा, अमनजोत कौर.

    मलेशिया: आइना हमिझाह हाशिम, विनिफ्रेड दुराईसिंगम (कर्णधार), मास अलिसा, वान ज्युलिया (विकेटकीपर), माहिरा इज्जती इस्माईल, आयना नजवा, वान नूर जुलैका, नूर अरियाना नटस्या, अस्या अलिसा, नूर दानिया सिउहादा, निक नूर अटिएला.