शिखर धवनचे रोहित शर्मावर मोठे वक्तव्य, म्हणाला, “त्याने माझे करिअर…..”

Shikhar Dhawan on Rohit Sharma : भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. गेल्या एक वर्षापासून निवड समितीने त्याला संघात संधी दिली नाही. त्याने रोहित शर्माबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

  Shikhar Dhawan on Rohit Sharma : भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. गेल्या एक वर्षापासून निवड समितीने त्याला संघात संधी दिली नाही. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही धवनचा समावेश नव्हता. अशा परिस्थितीत तो संघात पुनरागमन करण्यासाठी खूप उत्सुक आहे. दरम्यान, शिखर धवनने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. जाणून घेऊया शिखर काय म्हणाला.

  रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघेही एकत्र सलामीला

  शिखर धवन म्हणाला, जेव्हा मी आणि रोहित शर्मा दोघेही एकत्र सलामी करीत होतो, तेव्हा दुसऱ्या टोकाला उभा असलेला रोहित दबाव कमी करत असे. आम्ही दोघे एकमेकांना समजून घेत होतो. रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करणे नेहमीच आरामदायक होते. आम्ही मिळून ६००० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित आणि मी भारतीय क्रिकेटसाठी सर्वात यशस्वी सलामी भागीदारी बनवली आहे. त्यामुळे मी माझ्या अनेक सर्वोत्तम कामगिरीचे श्रेय रोहित शर्माच्या समर्थनाला देतो. त्यानं माझं करिअर बनवलं आहे.”

  धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक

  शिखर धवननेही धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि म्हणाला, “(एम.एस. धोनी) भाई मैदानावर खूप शांत स्वभावाचे आहेत. हा शांत स्वभावाचा दृष्टिकोन त्याच्या कर्णधारपदाचे वैशिष्ट्य आहे. धोनीभाईने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांसाठी अनेकदा प्रशंसा केली जाते. विशेषत: दबावाच्या परिस्थितीत माही त्याच्या क्रिकेटच्या कौशल्यासाठी ओळखला जातो.”

  रोहित आणि त्याची सर्वोत्तम भागीदारीही आठवली
  शिखर धवनने त्याच्या विधानात पुढे खुलासा केला की, त्याच्या आणि रोहितमधील कोणती भागीदारी त्याला सर्वात जास्त आवडते. तो यावर म्हणाला, “रोहित दुसऱ्या बाजूला आक्रमक खेळी करून समोरच्या फलंदाजाला दिलासा आणि आश्वासन देतो. मला वाटते की २०१९ मध्ये मोहाली येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९३ धावांची सलामीची भागीदारी ही आमची सर्वोत्तम खेळी होती. दुबईतील २०१८ आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध दुसरी सर्वोत्तम भागीदारी होती जिथे आम्ही पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली होती.”

  भारतीय संघात शिखर धवनचे मोलाचे योगदान आहे
  ३८ वर्षीय शिखर धवनने भारतासाठी आतापर्यंत एकूण ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत. धवनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २३१५, एकदिवसीयमध्ये ६७९३ आणि टी-२० मध्ये १७५९ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत ७ शतके आणि ५ अर्धशतके, वन डेमध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतके आणि टी-२० मध्ये ११ अर्धशतके केली आहेत.

  एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०१३ ते २०२२ पर्यंत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी डावाची सुरुवात करताना ५१४८ धावा केल्या आहेत. आता संघाबाहेर असलेल्या शिखर धवनने त्याचा साथीदार आणि कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे.