धक्कादायक! आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रार्थना साळवेची आत्महत्या

प्रार्थनाने आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि हा सामनाही भारतीय संघाने जिंकला होता. प्रार्थनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.

    मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रार्थना साळवे हिने आत्महत्या केली आहे. भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून 17 वर्षीय प्रार्थना साळवे हिने आत्महत्या केली असून क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रार्थनाने आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

    बैतुल येथील कालापाठा परिसरात राहणाऱ्या प्रार्थना साळवे हिचा मृतदेह गुरुवारी कोसमी धरणात आढळून आला. बुधवारी संध्याकाळी प्रार्थनाने तिच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप व्हॉईस मेसेज पाठवून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. आत्महत्येमागे तिने भावाचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले. प्रार्थनाने मेसेजमध्ये सांगितले की, तिच्या भावाच्या निधनामुळे ती खूप अस्वस्थ आहे.नातलगांना प्रार्थनाचा मेसेज ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तत्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. प्रार्थनाची स्कूटी धरणाच्या काठावर उभी होती. गुरुवारी सकाळी एसडीआरएफच्या टीमने प्रार्थनाचा मृतदेह धरणातून बाहेर काढला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

    मागच्या सात महिन्यांपूर्वी इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीत एका प्रियकराने एका मल्टीला आग लावली होती. आ आगीत प्रार्थनाचा भाऊ देवेंद्र साळवे जळून ठार झाला होता. भावाच्या मृत्यूनंतर प्रार्थनाला धक्का बसला होता. भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून प्रार्थना सावरू शकली नाही. यातूनच तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. याशिवाय प्रार्थनासोबत आणखी एक घटना घडली होती. टूर्नामेंट दरम्यान लिगामेंट फुटल्यामुळे प्रार्थना देखील खूप अस्वस्थ होती. त्यामुळे तिला तिचे भविष्य अंधारात दिसत होते. प्रार्थनाने आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि हा सामनाही भारतीय संघाने जिंकला होता. प्रार्थनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.