धक्कादायक! खेळाडूंना शौचालयात वाढण्यात आले जेवण

    उत्तरप्रदेश : यूपीच्या सहारनपूरमध्ये (Saharanpur) कबड्डी टूर्नामेंट दरम्यान २०० खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सहारनपूर येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये खेळाडूंचे भोजन तयार करून ते शौचालयात ठेवण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे २०० खेळाडूंना टॉयलेट मधेच जेवणाचे वाटप करण्यात आले. एवढेच नाही तर खेळाडूंना दिलेला भातही अर्धवट शिजवून दिला होता.

    सहारनपूर मधील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियम मध्ये राज्यस्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली होती. यावेळी स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये २०० हून अधिक कबड्डीपटूंचे जेवण तयार करून ठेवण्यात आले होते. तसेच त्यानंतर खेळाडूंना ते जेवण तेथेच वाढण्यात आले.


    सोशल मीडियावर चित्रे समोर आल्यानंतर, खेळाडूंनी आरोप केला की, स्विमिंग पूलजवळ भात शिजवला गेला. त्यानंतर तो एका मोठ्या प्लेटमध्ये काढून टॉयलेटच्या फरशीवर ठेवला. भाजी आणि पुर्‍याही तयार करून टॉयलेटमध्ये ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.