राष्ट्रकुल स्पर्धेत श्रीशंकर, मनप्रीतने गाठली अंतिम फेरी

    जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सातवे स्थान मिळविणाऱ्या श्रीशंकर मुरलीने आता बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील लांब उडीत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता भारताच्या श्रीशंकर सुवर्णपदकाच्या अपेक्षांत वाढल्या आहेत. लांब उडीत प्रकारात मुरलीचा साथीदार महम्मद अनिस आणि महिला गोळाफेकीत मनप्रीत कौर यांनीही अंतिम फेरी गाठून पदकासाठी सर्वांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

    श्रीशंकर मुरलीने लांब उडी प्रकारात पहिल्याच प्रयत्नात ८.०५ मीटरवर उडी मारून आपले अंतिम फेरीतले स्थान पक्के केले आहे. त्याच्या उडीच्या वेळी वाऱ्याचा वेग २.७ मीटर प्रतिसेकंद असा त्याच्या बाजूने नोंदवला गेला असून या कामगिरीमुळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या १२ खेळाडूं मध्ये तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी ८.३६ मीटर अशी आहे. तर भारताचा दुसरा खेळाडू महम्मद अनिस यानेही दुसऱ्या प्रयत्नात ७.६८ मीटर अंतरावर उडी मारून अंतिम फेरी गाठली असून तो सध्या आठव्या स्थानावर आहे.

    लांब उडी स्पर्धेची अंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी रात्री ७.४५ ला (भारतीय वेळेनुसार ५ तारखेला १२.१५ वाजता) होणार असून या सामन्याकडे भारतीय डोळे लावून बसले आहेत. महिलांच्या गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रमवीर ३२ वर्षीय मनप्रीत कौरने दुसऱ्या प्रयत्नात १६.७८ मीटर अंतरावर गोळा फेकून अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या प्रयत्नात तिला १६.६८ मीटर अंतरावरच गोळा फेकता आला असून यापूर्वी १७.९६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर नोंदवण्यात आला आहे.