लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकराला रौप्यपदक

    बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे खेळाडू दमदार कामगिरी करीत आहेत. गुरुवारी स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकर यांने लॉन्ग जंप (लांब उडी) (Long jump)या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुरली श्रीशंकरनं स्पर्धेत ८.०८ मीटर इतकी लांब उडी मारली. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन्ग जंप मध्ये पदक जिंकणारा श्री शंकर हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.

    मुरली श्रीशंकरने उपांत्य फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८. ०५ मीटर उडी मारत अंतिम फेरीतील त्याचे स्थान पक्के केले होते. उपांत्य फेरीत श्रीशंकराच्या उडी वेळी वाऱ्याचा वेग हा २. ७ मीटर प्रति सेकंड इतका असा त्याच्या बाजूने नोंदवला गेला होता त्यामुळे अंतिम फेरीतील १२ स्पर्धकांमध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले होते. अंतिम फेरीतही श्रीशंकर ने अशीच कमाल दाखवत ८.०८ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह रौप्यपदक जिंकले. श्रीशंकर पूर्वी महिला माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रज्यूषा यांनी देशासाठी लॉन्ग जंप प्रकारात पदकं जिंकली आहेत. अंजू बॉबीनं २००२ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य आणि २०१० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रज्यूषानं रौप्यपदक जिंकलं होतं. तर लांब उडीत प्रज्युषा पहिलं रौप्य पदक जिंकलं होतं.

    श्रीशंकरने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले, “एम. श्रीशंकरचे CWG मधील रौप्य पदक विशेष आहे. अनेक दशकांनंतर भारताने CWG मध्ये पुरुषांच्या लांब उडीत पदक जिंकले आहे. त्याची कामगिरी भारतीय अॅथलेटिक्सच्या भवितव्यासाठी चांगली आहे. त्याचे अभिनंदन. येणाऱ्या काळातही तो उत्कृष्ट कामगिरी करत राहो.”