नवी मुंबईच्या शुभम वनमाळीला तेनझिंग नोर्गे पुरस्कार

शुभम वनमाळी Shubham Vanmali) हा मूळचा डहाणू तालुक्यातील कासा गावचा असून सध्या आपल्या कुटुंबियासहीत नवी मुंबईतील नेरूळ येथे राहत आहे.

    नवी मुंबई : महाराष्ट्राचा सागरपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शुभम धनंजय वनमाळी (Dhananjay Vanmali) याला ३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते साहसी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा २०२१ सालचा तेनझिंग नोर्गे पुरस्कार (Tenzing Norgay Award) देऊन गौरवण्यात आले.

    शुभम वनमाळी Shubham Vanmali) हा मूळचा डहाणू तालुक्यातील कासा गावचा असून सध्या आपल्या कुटुंबियासहीत नवी मुंबईतील नेरूळ येथे राहत आहे. शुभमने जगातील जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्लिम, राजभवन,गेट वे ऑफ इंडीया ते डहाणू,बोर्डी ते डहाणू, वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम केलेले आहेत. येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसात पोहून पार करण्याचा धाडसी मानस शुभमने केला आहे.

    शुभमचे वडील धनंजय वनमाळी हे राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू असून आई दिपीका वनमाळी या कबड्डीमधील राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. तर बहीण देखील शुभमच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रीय जलतरणपटू असून सध्या दिल्ली येथे प्रशिक्षण घेत आहे.