ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

    Brij Bhushan Singh Women Wrestler Sexual Harassment : दिल्ली न्यायालयाने भाजपचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा नोंद करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. दिल्ली कोर्टाने ब्रिजभूषणविरुद्ध विनयभंगाचादेखील गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे. दिल्ली कोर्टाने सांगितले की, ब्रिजभूषणविरुद्ध गुन्हा दाखल करण्याइतके सबळ पुरावे आहेत.

    ब्रिजभूषणची निर्दोष मुक्तता

    कोर्टाने आदेश दिला आहे की, ब्रिजभूषणविरुद्ध कलम 354 आणि 354 अ अंतर्गत गुन्हे दाखल करा. मात्र, याचबरोबर सहाव्या महिलाकुस्तीपटूने केलेल्या आरोपांमधून कोर्टाने ब्रिजभूषणची निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्ली कोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाचा माजी सचिव विनोद तोमर यांच्याविरुद्धदेखील महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरुद्ध सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करीत तक्रार दाखल केली होती.

    ब्रिजभूषण याच्यावर गुन्हा दाखल

    भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष असलेल्या ब्रिजभूषण याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंंदोलन देखील केलं होतं. यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे भारताचे प्रसिद्ध कुस्तीपटू आघाडीवर होते. कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा दबाव वाढल्यावर सरकारला देखील हस्तक्षेप करत ब्रिजभूषणला पदावरून हटवावं लागलं होतं. त्यानंतर भाजपनं त्याचं खासदारकीचं तिकीट कापलं मात्र त्याच्या मुलाला ते तिकीट देण्यात आलं.