Rohit Sharma Profile
Rohit Sharma Profile

Rohit Sharma Profile : एकेकाळी करिअर संपलं अशी चर्चा असलेला रोहित शर्मा आज करिअरच्या उत्तुंग शिखरावर आहे. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे मी मी म्हणणाऱ्या गोलंदाजांना जेरीस आणलंय.

  Rohit Sharma Profile : बॅकफूटवर जाऊन लेगला उत्तुंग षटकार मारण्याची हातोटी, बोलर कोणीही असो, बॉल कसाही येवो, काडकन एखाद्याच्या कानशिलात लगावल्याप्रमाणे त्याला सीमापार करण्याची क्षमता असणारा मुंबईचा पोरगा. पण एक वेळ अशी आली की खराब कामगिरीमुळे 2011 च्या वर्ल्ड कपच्या भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मग संपला संपला म्हणताना पुन्हा फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली आणि मी मी म्हणणाऱ्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. पुढे तीन वर्ल्ड कप गाजवले, वन डेमध्ये तीन डबल सेंचुरी मारल्या. तो लहान असताना त्याच्या काकांनी मित्रांकडून पैसे गोळा केले आणि त्याला क्रिकेट अकॅडमीमध्ये घातलं. ऑफ स्पिनर होऊन फलंदाजांच्या दांड्या गुल करायची मनिषा ठेवणारा नंतर एक स्फोटक फलंदाज बनला आणि भल्याभल्या संघाना रडवलं. तो जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत समोरच्या टीमचं काहीच खरं नसतंय. आता करियरमधील शेवटचा पूल शॉट मारून इतिहास घडवायच्या तयारीत आहे. हा मुंबईचा पोरगा आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma).
  रोहित शर्मा म्हटलं की समोर येतो तो हसरा चेहरा. आता हाच रोहित 140 कोटी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवायच्या तयारीत आहे. पण आतापर्यंतची त्याची कारकीर्द (Rohit Sharma Cricket Career) एखाद्या रंजक चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे.
  रोहित शर्माच्या खराब फॉर्ममुळे 2011 सालच्या वर्ल्ड कपच्या भारतीय संघात त्याला स्थान मिळालं नाही. त्यानंतर रोहित खूप हताश झाला आणि त्याची कारकीर्द संपली, रोहितचे क्रिकेट संपले अशी चर्चा सुरू झाली. पण थांबतो तो रोहित कसला? त्यावेळी दुर्लक्षित असलेला रोहित पुढे जाऊन वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं मारेल अशी कल्पना कुणीही केली नव्हती.
  नागपुरात जन्म, मुंबईत वाढला (Rohit Sharma Birth)
  रोहित गुरुनाथ शर्मा, जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूरमध्ये झाला. त्याचे वडील नोकरी करायचे तर आई गृहिणी होती. लहानपणीच तो त्याच्या काकांकडे, बोरिवलीला राहायला आला. क्रिकेटची आवड असलेल्या रोहितला क्रिकेट अकॅडमीमध्ये ट्रेनिंग द्यायचं असं त्याच्या काकांनी ठरवलं खरं, पण पैशांची अडचण होती. मग 1999 साली त्याच्या काकांनी मित्रांकडून पैसे गोळा केले आणि एका क्रिकेट अकॅडमीमध्ये रोहितचं नाव नोंदवलं. जगातील स्फोटक ओपनर असलेल्या रोहित शर्माने त्याच्या क्रिकेटची सुरुवात एक ऑफ स्पिनर बॉलर म्हणून केली.
  दिनेश लाड यांनी रोहितचे कौशल्य ओळखलं (Rohit Sharma Coach Dinesh Lad)
  क्रिकेट कोच दिनेश लाड (Dinesh Lad) हे त्यावेळी फेमस नाव. त्यांनी मुंबईतील अनेक खेळाडू हेरले आणि घडवले. त्यांची नजर रोहितवर पडली आणि त्यांनी त्याच्यावर विशेष लक्ष दिलं. सर्वात पहिलं काम म्हणजे त्यांनी क्रिकेटसाठी रोहित शर्माची शाळा बदलली. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Swami Vivekanand International School) त्याचं नाव नोंदवलं. पण अडचण होती ती पैशाची. दिनेश लाड यांनी तीही सोडवली. त्यांनी रोहितला एका स्कॉलरशिप मिळवून दिली आणि पुढच्या चार वर्षांच्या पैशाचा प्रश्न सुटला. या संधीचा फायदा रोहित शर्माने घेतला आणि झोकून देऊन प्रॅक्टिस केली.
  बोलर रोहित ओपनर बॅट्समन झाला (Rohit Sharma Cricket Debut)
  ऑफ स्पिन बोलिंग करणारा रोहित बॅटिंगसाठी आठव्या क्रमांकावर यायचा. मग दिनेश लाड यांनी त्याला बॅटिंगवर फोकस करायला लावलं आणि थेट ओपनिंगला धाडलं.
  सन 2005 साली रोहित शर्माने देवधर ट्रॉफीमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. त्याचा फायदा असा झाला की 2006 मध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट संघामध्ये रोहितचा समावेश झाला. त्यानंतर लगेच त्याने इंडिया ए टीमकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वर्षी रोहित शर्माने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. मुंबईकडून खेळत असलेल्या रोहितच्या टीमने त्यावर्षीची रणजी ट्रॉफी जिंकली.
  पहिला आंतरराष्ट्रीय सामना पण खेळायलाच मिळालं नाही
  रोहित शर्माची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आणि 23 जून 2007 रोजी आयर्लंड विरोधात एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. पण त्या सामन्यात रोहितला बॅटिंगच मिळाली नाही. एका विकेट्च्या बदल्यात भारतीय संघाने आयर्लंडचे आव्हान पार केलं.
  वर्लकपमधून बाहेर, पण नशिबाने पुन्हा संधी दिली
  त्यानंतरच्या दोन-तीन वर्षाच्या काळात रोहित शर्माने फार काही चांगली चमकदार खेळी केली नाही. त्याचा परफॉर्मन्स एवढा खराब होता की 2011 च्या वर्ल्ड कप टीममध्येही त्याचा समावेश झाला नाही. त्या वर्षी भारताने तो वर्ल्ड कप जिंकला. नंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्याच्या वेळी युवराज सिंह जखमी झाला आणि त्या ठिकाणी नशिबाने रोहित शर्माची निवड झाली. त्या मालिकेत रोहितने चांगली कामगिरी केली.
  धोनीचा विश्वास आणि कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट
  रोहित शर्माचे क्रिकेट करिअर तोपर्यंत हेलखावेच खात होतं. पण महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि रोहितला थेट ओपनिंग करायला सांगितलं. तो काळ म्हणजे स्फोटक ओपनर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरच्या क्रिकेटचा शेवटचा काळ. त्यामुळे भारताला त्याच तोडीच्या ओपनर फलंदाजांची गरज होती. धोनीनं संधी दिली आणि ओपनिंग करायला आलेल्या रोहितने त्यानंतर मात्र कधीही मागे पाहिलं नाही. त्याने सुरुवातील शिखर धवनच्या साथीने स्फोटक ओपनिंग करायला सुरूवात केली आणि त्याचा धसका जगभरातल्या सर्वच संघांनी घेतला. ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माची बॅट तळपली आणि भारतीय टीमचे रन मशिन बनली. रोहित शर्मा मैदानात आला की बॉलर कुणीही असो, बॉल सीमापार जाणारच. फोर पेक्षा सिक्स मारण्यावर रोहितचा भर. त्यामुळे भल्याभल्या गोलंदाजांची पळता भुई थोडी होते.
  तीन डबल सेंच्युरी (ODI Centuries Of Rohit Sharma)
  सचिनच्या नंतर भारतीय क्रिकेटमध्ये जर कुणी भरवशाचा फलंदाज असेल तो म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. दोघांच्या स्टाईल वेगळ्या पण बॅटमधून धावांचा पाऊस पडणार हे मात्र नक्की. रोहित शर्मा मैदानात आला की विरोधी संघाला धसकाच बसतो, त्याने शतक केलं तर त्याहून अधिक धसका, कारण त्याने आतापर्यत वनडे मध्ये तीन डबल सेंच्युरी (Rohit Sharma Double Centuries) मारल्या आहेत. 2013 साली ऑस्ट्रेलियाविरोधात 209, त्यानंतर श्रीलंकेविरोधात 264 आणि 208 धावा त्याने केल्या आहेत. रोहित शर्माला तुलनेने कमी कसोटी सामने खेळायला मिळाले. पण त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात 177 धावा केल्या आहेत.
  आयपीएलचा बादशाह (Rohit Sharma IPL Career)
  आयपीएल म्हटलं तर मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्स म्हटलं तर रोहित शर्मा हे समीकरणच. 2008 साली रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा. 2011 साली त्याला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) खरेदी केले. त्यानंतर 2013 साली मुंबई इंडियन्सची धुरा त्याच्या खांद्यावर आली. कर्णधार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोहित शर्मा. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल सहा वेळा आयपीएल जिंकले आहे.
  रोहित शर्माचा वर्ल्ड कपमधील परफॉर्मन्स (Rohit Sharma World Cup Performance)
  – 2011 च्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये रोहित शर्मा जागा मिळाली नाही.
  – 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने आठ सामने खेळले आणि त्यामध्ये 330 धावा ठोकल्या.
  – 2019 सालचा वर्ल्डकप हा रोहित शर्मा साठी खूप चांगला ठरला. त्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने एकूण 9 सामने खेळले आणि त्यामध्ये 680 धावांचा डोंगर रचला. त्यामध्ये पाच शतक ठोकली. रोहित शर्माला 2020 साली खेलरत्न पुरस्काराने (Khelratna Award) सन्मानित करण्यात आलं. त्याच्यासोबत त्याचे गुरू दिनेश लाड यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने (Dronacharya Award) सन्मानित करण्यात आलं.
  पहिल्याच नजरेत प्रेम आणि डेटिंग (Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story)
  रोहित शर्माची पत्नी रितिका (Rohit Sharma Wife Ritika Sajdeh) ही तितकीच प्रसिद्ध. रितिका आणि रोहितची 2008 साली रिबॉकच्या एका स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये भेट झाली. रितिका म्हणजे युवराज सिंहची मानलेली बहीण. त्यानेच त्याची आणि तिची ओळख करून दिली. नंतर या दोघे एकमेकांना भेटू (Rohit Sharma Girlfriend) लागले आणि डेटिंगही सुरू केली. रितिका नंतर रोहितची मॅनेजर बनली आणि 2015 साली त्यांनी लग्न केले.
  वन डे असो, कसोटी असो वा T 20 असो… बोलिंग असो, बॅटिंग असो वा कॅप्टन्सी असो… रोहित शर्मा हा सगळ्याच प्रकारात डॉन (Rohit Sharma Record) आहे. करिअर संपलं अशी अनेकदा त्याच्यावर टीका झाली, त्या टीकाकारांना त्याने बॅटमधून उत्तर दिलं. आज रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च पॉईंटवर आहे. मुंबईचा हा चिवट पोरगा ही बाजी पण नक्की मारणार यात शंकाच नाही.