
IND Vs NZ Semifinal : भारताने वनडे वर्ल्डकप 2023 ची लीग स्टेज 9 पैकी 9 सामने जिंकून पूर्ण केली. मात्र मिशन 11 मधील अजून दोन पेपर तेही अवघड पेपर येत्या काही दिवसात भारतीय संघाला द्यायचे आहेत. लीग स्टेजमधील कामगिरी पाहून भारतीय संघाने यावेळी सर्व विषयांची तगडी तयारी केली असल्याचे जाणवते. मात्र न्यूझीलंडविरूद्धचा पेपर… तोही बाद फेरीत सोडवणे दिसते तितके सोपे नाही.
किवींनी शांतीत क्रांती करण्याचा आपला दर्जा गेल्या काही वर्षापासून कायम राखला आहे. या क्रांतीमुळे टीम इंडियाचं फार मोठं नुकसान झालं आहे. मग ती पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल असो वा 2019 च्या वर्ल्डकपची सेमी फायनल. यंदा मात्र टीम इंडियाला 2019 च्या वर्ल्डकपमध्ये केलेल्या चुका पुन्हा करून उपयोग नाही.
घातकी अती आत्मविश्वास
वर्ल्डकप 2019 मध्ये भारतीय संघाची टॉप ऑर्डर धुमाकूळ घालत होती. मात्र सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात टॉप ऑर्डरला खिंडार पडलं अन् मधली फळी तो दबाव झेलू शकली नाही.
यंदाही भारतीय संघातील टॉप ऑर्डर आणि मधली फळी देखील दमदार फॉर्ममध्ये आहे. मात्र अती आत्मविश्वात संघासाठी घातकी ठरू शकतो.
टॉपच्या तीन फलंदाजांकडून हाराकिरी नको
गेल्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे तीन फलंदाज 5 धावात गारद केले होते. त्यानंतर भारताची अवस्था आधी 4 बाद 24 नंतर 5 बाद 71 अशी झाली होती. पावसामुळे बाधा आलेल्या सामन्यात भारत न्यूझीलंडचे 239 धावांचे आव्हान चेस करू शकले नाही.
यावेळीही भारताला पाठोपाठ दोन – चार विकेट्स गमावण्याची चूक महागात पडू शकते. भारताचे पाच पैकी तीन फलंदाज देखील चांगली कामगिरी करू शकले तरी सामन्यावर भारताची पकड निर्माण होईल. याचबरोबर न्यूझीलंडचा फिल्डिंगचा स्तर उच्च असतो. त्यामुळे धावबाद होणे टाळावे लागले. कारण धोनीचा तो रन आऊट चाहते अजून विसरू शकलेले नाहीत.
गोलंदाजांवर मोठी जबाबदारी
गेल्या वर्ल्डकपमध्ये भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडला 239 धावात रोखले होते. यावेळी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात मोहम्मद शामी, सिराज आणि फिरकीमध्ये रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव दमदार कामगिरी करत आहेत.
या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला 273 धावात रोखले होते. आता सेमी फायनलचा सामना हा वानखेडेवर आहे. ही खेळपट्टी सहसा फलंदाजांना साथ देते. मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर गोलंदाजांनीही खेळपट्टीची साथ लाभेल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना आपले सर्वस्व झोकून गोलंदाजी करावी लागेल.
फिरकी गोलंदाजांनी धावा रोखणे गरजेचे
गेल्या वर्ल्डकप सेमीफायनल सामन्यात भारताच्या सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. मात्र युझवेंद्र चहल नियंत्रण राखू शकला नाही अन् त्याने 10 षटकात 63 धावा दिल्या. त्याच्या खालोखाल 55 धावा देणारा हार्दिक पांड्या दुसरा महागडा गोलंदाज ठरला होता.
त्यामुळे भारताला सहाव्या गोलंदाजाचा पर्याय चाचपून पाहिला पाहिजे. नेदरलँड्सविरूद्ध विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांनी गोलंदाजी केली. त्यामुळे हा मुद्दा टीम इंडियाच्या ध्यानी आहे असे दिसते.
निर्णयात गोंधळ नको
भारताने 2019 च्या सेमी फायनलमध्ये धोनीच्या बॅटिंग पोजिशनमध्ये बदल केला. यावेळी टीम इंडिया विनिंग कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरेल याची काळजी घ्यावी लागले. सध्याच्या घडीला तरी भारतीय संघात असा अचानक कोणताही बदल होईल अशी स्थिती नाही. जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर टीम इंडिया फायनल गाठू शकते.