तेजस्वीन शंकरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास

    बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा खेळाडू तेजस्वीन शंकरने ट्रॅक अँड फील्ड या स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. तेजस्वीन शंकरने ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला कांस्यपदकाच्या रूपात पहिले पदक मिळवून दिले आहे. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत उंच उडीत (High jump)भारतासाठी पदक जिंकणारा तेजस्विन हा पहिला खेळाडू ठरला आहे. तेजस्विनने अंतिम सामन्यात पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत २. २२ मीटर उडी मारून कांस्यपदकला गवसणी घातली आहे.

    शंकरने तिसऱ्यावेळी २. १९ मीटर उंच उडी मारण्याचा पहिला प्रयत्न केला. तो पहिल्या प्रयत्नातच २. १९ मीटर उंच उंडी मारण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो पदकांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने २. २२ मीटर उंच उडी मारत आपले आव्हान कायम ठेवले. दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडचा हामिश केर आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रँडन स्टार्क यांनी देखील दमदार उंच उडी मारत पदकांच्या शर्यतीत आघाडी मिळवली.

    केर आणि स्टार्क यांनी २. २५ मीटर उंच उडी मारत सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आघाडी घेतली. मात्र तेजस्विन शंकरला २. २५ मीटर उडी मारण्यात यश आले नाही. त्याने दोन वेळा २. २५ मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा प्रयत्न फसला. अखेर शंकरने २. २८ मीटर उंच उडी मारण्याचा शेवटचा प्रयत्नही करून सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. मात्र पहिल्यांदाच तेजस्विन शंकरने उंच उडीत भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून दिल्या बद्दल त्याचे सर्वस्थरावून कौतुक होत असून नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शंकरचे कौतुक केले आहे.