विश्वचषक जिंकल्यानंतर मेस्सीला सन्मान म्हणून दिलेल्या काळ्या ‘बिश्त’ गाऊनला कोट्यवधीची मागणी

विश्वचषक हा अरब राष्ट्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बिश्त हा अरब देशांमध्ये लोकप्रिय आणि पारंपारित पुरुषांचा पोशाख आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर मेस्सीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून ट्रॉफी उचलली. या काळ्या रंगाच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

    मुंबई : फिफा विश्वचषकाचा चाहत्यांमध्ये असलेला फिव्हर कमी होण्याचं नाव घेत नाही. कतार येथे खेळवण्यात आलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यातील लढतीत अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला. तब्बल ३६ वर्षांनी अर्जेंटिना संघाने फुटबॉल विश्वचषक उचलला आणि कर्णधार मेस्सीचे देशाला जगजेत्तात बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरले. या ऐतिहासिक क्षणी कर्णधार लिओनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच ‘बिश्त’ घालण्यात आला. आता या गाऊनची बरीच चर्चा रंगली असून मेस्सीचा हा गाऊन खरेदी करण्यासाठी कोट्यवधींची बोली लावण्यात आली आहे.

    कतारचे इमिर तमिम बिन हमद अल थानी यांनी मेस्सीला हा बिश्त गाऊन सन्मान म्हणून घातला होता. त्यानंतर ओमानी वकील आणि खासदार अहमद अल बारवानी यांनी या बिश्तसाठी 1 मिलियन डॉलर्सची (8.2 कोटी रुपये) बोली लावली आहे. यासाठी बारवानी यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “ओमानच्या सल्तनतकडून, कतार 2022 विश्वचषक जिंकल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. अरबी बिश्त हे शौर्याचे प्रतीक आहे. त्या बिश्तच्या बदल्यात मी तुम्हाला एक मिलियन डॉलर्स ऑफर करत आहे.”

    बारवानी यांनी द नॅशनलशी बोलताना सांगितले की “खेळाडूला वाटाघाटी करायची असल्यास अधिक पैसे देण्यास तयार आहे. कतारच्या अमीराने मेस्सीला बिश्त दिला तेव्हा मी स्टेडियममध्ये तो क्षण थेट पाहत होतो.” अल बारवानी यांनी पुढे सांगितलं की, विश्वचषक हा अरब राष्ट्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बिश्त हे शौर्य, सचोटी, औदार्य आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.अरब देशांमध्ये बिश्त हा लोकप्रिय आणि पारंपारित पुरुषांचा पोशाख आहे. बिश्त उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरपासून बनलेला आहे. अरब राष्ट्रांमध्ये मान्यवर, लग्न, सण, पदवी आणि ईद यांसारख्या विशेष प्रसंगी परिधान केले जाते.अंतिम सामना जिंकल्यानंतर मेस्सीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून ट्रॉफी उचलली. या काळ्या रंगाच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.