विदेशी असणार टीम इंडियाचा मुख्य कोच? गौतम गंभीर-वीरेंद्र सेहवाग यांच्या नावाचीही चर्चा

पुढील भारताचा मुख्य प्रशिक्षक कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. BCCI ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

  टीम इंडियाचा मुख्य कोच : भारताचा संघ कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली T-20 विश्वचषक 2024 खेळणार आहे. T-20 विश्वचषक 2024 (T-20 World cup 2024)काही दिवसातच सुरु होणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा T-20 विश्वचषक 2024 कडे लागल्या आहेत. T-20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय संघामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे पुढील भारताचा मुख्य प्रशिक्षक कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. BCCI ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

  BCCI ची सोशल मीडिया पोस्ट

  या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक (वरिष्ठ पुरुष) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

  या प्रशिक्षकांच्या नावाची चर्चा

  सोशल मीडियावर अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की, यावेळी एका परदेशी व्यक्तीला भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनवला जाऊ शकतो. यासाठी भारतीय बोर्डाने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगसह काही खेळाडूंशी चर्चा केली आहे असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर माजी भारतीय दिग्गज गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचीही नावे भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज जस्टिन लँगरचेही नाव दावेदारांमध्ये आहे.

  27 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे आहे. बीसीसीआयने द्रविडची एकदिवसीय विश्वचषक 2023 पर्यंत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर भारतीय बोर्डाने द्रविडचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2024 पर्यंत वाढवला होता. हा विश्वचषक 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकाची प्रक्रिया सुरू केली आहे.

  जय शहा यांनी केले स्पष्ट

  काही दिवसांपूर्वीच जय शाह म्हणाले होते, ‘आम्ही येत्या काही दिवसांत अर्ज मागवू, राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे. त्याला पुन्हा अर्ज करायचा असेल तर तो करू शकतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांसारख्या कोचिंग स्टाफचा निर्णय नवीन प्रशिक्षकांशी सल्लामसलत करून घेतला जाईल. नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक 2027 साठी असेल. ही बाब खुद्द जय शहा यांनीही स्पष्ट केली होती. नवीन मुख्य प्रशिक्षकाला 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत पदभार स्वीकारण्याची ऑफर दिली जाईल, असे ते म्हणाले होते.