फिफा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात यजमान कतार संघाचा पराभव

    कतार येथे २० नोव्हेंबर रोजी फिफा विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. फिफा २०२२ चा नेत्रदीपक सोहळा काल पारपडला असून या सोहळ्यानंतर इक्वॉडोर विरुद्ध कतार या दोन संघात सामना पारपडला. या सामन्यात इक्वाडोरनं कतारवर दमदार मात करून फिफा २०२२ ची विजयी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात इक्वाडोरने २-० अशी आघाडी घेऊन कतार संघाचा पराभव केला.

    इक्वॉडोर विरुद्ध कतार सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला इक्वाडोरनं गोल डागत कतारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण रेफरीनं VAR द्वारे गोल रद्द झाल्याचं घोषित केलं. हा गोल व्हॅलेन्सियानं केला होता. त्यानंतर याच सामन्याच्या १६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३१ व्या मिनिटाला व्हॅलेन्सियानं शानदार हेडर करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. एनर व्हॅलेन्सियाने इक्वाडोरसाठी दोन्ही गोल केले आणि आपल्या संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह व्हॅलेन्सिया विश्वचषकात चार गोल करणारा इक्वाडोरचा पहिला खेळाडू ठरला आहे.