अखेर व्हिसा मिळाला! भारत विरुद्ध वेस्टइंडीज शेवटचे २ सामने अमेरिकेत होणार

    भारत विरुद्ध वेस्टइंडीज (IND Vs WI) यांच्यात रंगलेल्या टी २० (T20) सामन्याकडे सध्या सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच आता भारत आणि आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन टी २० सामने आता अमेरिकेत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघातील खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने पुढील दोन सामान्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आता भारताच्या सर्व खेळाडूंसह सदस्यांना अमेरिकेला जाण्यासाठी अधिकृतपणे मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

    रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीमला फ्लोरिडा सामन्यांसाठी व्हिसा मिळाला आहे. रविचंद्रन अश्विन फ्लोरिडाला पोहोचला आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि इतर ११  जणांकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नव्हता, मात्र आता संपूर्ण टीमला व्हिसाची मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच टी-२० मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना फ्लोरिडामध्येच खेळवला जाईल हे आता निश्चित झाले आहे. वेस्ट इंडिजचा संघ आधीच अमेरिकेत पोहोचला आहे.

    क्रिकबझच्या अहवालानुसार ज्या खेळाडूंकडे व्हिसा नव्हता, त्याला गयाना येथील अमेरिकन मुलाखतीसाठी पाठवण्यात आले होते. तिसर्‍या टी-२० (T20) सामन्यानंतर ही मुलाखत झाली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा समावेश आहे. रवींद्र जडेजा, आर अश्विन, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव आधीच अमेरिकेला पोहोचले आहेत. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पुढे आहे. अशा परिस्थितीत चौथा टी-२० सामना जिंकून टीम इंडियाच्या नजरा सीरिज जिंकण्यावर असतील.