T-20 वर्ल्ड कप भारतात नाही; युएईत होणार आयोजन

    दिल्ली : यंदाचा टी-20 वर्ल्डकप भारताऐवजी युएईमध्ये आयोजित करावा लागणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवले असल्याचेही ते म्हणाले. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत असला तरी कोरोनावर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून यंदाचा टी-20 वर्ल्डकप भारताबाहेर हलवणे बीसीसीआयला भाग पडले आहे.

    यंदा टी-20 वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. परंतु, या स्पर्धेच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही गांगुलीने दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. टी-20वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसी ठरवेल, असे जय शाह म्हणाले.

    या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीच्या मंडळाची बैठक झाली होती. त्यावेळी भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहून टी-20 वर्ल्डकपच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला होता.

    भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने अखेर बीसीसीआयने टी-20 वर्ल्डकप भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा युएईमध्ये होणार असली तरी या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयच करणार आहे.