भारतीय ज्युदोपटू तुलिका मानने पटकावले रौप्य पदक

    बर्लिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू त्यांच्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दररोज विविध खेळात पदक पटकावून, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहेत. अशातच बुधवारी पारपडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय ज्युदोपटू तुलिका मान हिने 78 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे.

    तुलिकाने न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. यात तुलिकाने 1 मिनिट 53 सेकंदात सामना जिंकला होता. अंतिम फेरीत तुलिका समोर स्कॉटलंडच्या साराह ईडलिंग्टनचे आवाहन होते. मात्र या अतितटीच्या सामन्यात तुलिकाला पराभव पत्करावा लागला आणि म्हणून तुलिकाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी भारतासाठी ज्यूदोपटू सुशिला देवीने पहिले रौप्या पदक (Silver medal) जिंकले होते. सध्या सर्वस्थरातून तुलिकाचे कौतुक होत असले तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता.

    १४ वर्षांची असताना झाली वडिलांची निर्घृण हत्या

    तुलिका मान ही अवघ्या १४ वर्षाची असताना व्यावसायिक कारणामुळे तिच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याकठीण प्रसंगातून सावरत तुलिकाच्या आईने तिला वाढवले. तुलिकाची आई दिल्ली पोलीस दलात उप निरीक्षक पदावर कार्यरत आहे. तुलिकाने आपल्या वडिलांच्या हत्याच्या घटनेतून बाहेर पडत आपल्या कारकिर्दिवर लक्ष केंद्रित केले. तुलिकाला टॉप स्कीममधून बाहेर काढण्यात आल्यामुळे २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला भाग घेणे अवघड झाले होते. यापूर्वी तुलिका ही ४ वेळा ज्युदो खेळात राष्ट्रीय चॅम्पियन राहिली आहे.