
IPL 2023 Play Off : आयपीएल २०२३च्या सीजनमध्ये यंदा थराराक सामने पाहायला मिळाले. त्यामुळे आता प्ले-ऑफचे सामने कसे रंगणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साहीत आहेत.
नवी दिल्ली : आयपीएल २०२३च्या यंदाच्या सिजनमध्ये बरेच थरारक सामने पाहायला मिळाले. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्स आता चौथ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. त्यांना प्ले-ऑफचे तिकीट मिळालं आहे. त्यामुळे आता प्ले-ऑफचे सामने कसे रंगणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साहीत आहेत.
मागील वर्षी प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होऊन थेट विजेतेपदाला गवसणी घातलेल्या गुजरात टायटन्सने यावेळी देखील आपली तीच कामगिरी करुन दाखवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळताना गुजरातने १० सामन्यांचा विजय नोंदवत पहिले स्थान काबिज केले. त्यानंतर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने मागील वर्षीचे अपयश विसरत, १७ गुणांसह दुसरे स्थान पटकावत क्वालिफायर १ मध्ये आपली जागा बनवली. आता गुजरात आणि चेन्नई यांच्या दरम्यान मंगळवारी म्हणजे उद्या चेन्नई येथील चेपॉक मैदानावर क्वालिफायर १ सामना खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
गुजरात प्रमाणेच गेल्यावर्षी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या लखनऊने आपल्या कामगिरीत सातत्य दाखवले. त्यांनी १७ गुणांसह साखळी फेरी तिसऱ्या स्थानी संपवली. कर्णधार के.एल राहुल हंगामाच्या अर्ध्यातून दुखापतग्रस्त होऊन बाहेर झाल्यानंतर कृणाल पांड्याने यशस्वीरित्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत संघाला सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफसाठी पात्र ठरला. अखेरच्या सामन्यात आरसीबी पराभूत झाल्याने मुंबईला ही संधी मिळाली. लखनऊ आणि मुंबई यांच्या दरम्यान, बुधवारी २४ मेला एलिमिनेटर सामना होईल. या सामनाही चेन्नई येथे खेळला जाईल.
या सामन्यात पराभूत झालेला संघ थेट बाहेर पडेल. तर विजेत्या संघाला पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी क्वालिफायर २ चा सामना खेळता येईल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर २६ मेला होईल. तसेच आयपीएलचा अंतिम सामना याच मैदानावर २८ मे रोजी खेळला जाईल.