२०२२ च्या हंगामात दोन नवे संघ मैदानावर; आयपीएलमध्ये दिसणार ‘दस का दम’, बीसीसीआयची मंजुरी

आयपीएलच्या २०२२ च्या (IPL 2022) हंगामात एकूण दहा संघ असतील. अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदाबाद : इंडियन प्रिमिअर लीगमध्ये (IPL) दोन नवीन संघांचा समावेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आयपीएलच्या २०२२ च्या (IPL 2022) हंगामात एकूण दहा संघ असतील. अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) कोरोना महामारीमुळे (Corona Virus) सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झाले आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.
नव्या संघांची नावे गुलदस्त्यात

२०२१ मध्ये आयपीएलचे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२ पासून१० संघांचे आयपीएल असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

२०२१ च्या आयपीएलमध्ये २ संघ

१० संघांचा समावेश झाल्यास, अडीच महिन्यांच्या कालावधीत ९४ सामने खेळवताना आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडण्याची भीती आहे. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंची उपलब्धता हाही कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर प्रसारणकर्ते प्रत्येक वर्षी ६० सामन्यांसाठी पैसे मोजत असतात. स्टार इंडियाने २०१८ -२०२२ या कालावधीसाठी प्रत्येक ६० सामन्यांच्या मोसमाकरिता १६,३४७ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढल्यास, त्यांच्याशी नव्या कराराबद्दल बोलणी करावी लागेल. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये आठ संघ असतील.