
स्टेडियमच्या रचने संदर्भातली प्रेरणा ही भगवान शिवाकडून घेण्यात आली असून यासाठी विविध प्रकारच्या रचना विकसित केल्या जाणार आहेत.
वाराणसी – आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम : आज वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी हजेरी लावली. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह उपस्थित होते. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर आणि कपिल देव उपस्थित होते. वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम म्हणजे क्रीडा क्षेत्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे.
या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले, येथे भव्य स्टेडियम बांधल्यास लोकांची संख्या वाढेल, रोजगार उपलब्ध होईल, ज्याचा फायदा माझ्या काशीला होईल. याशिवाय दुकानदार, टॅक्सी चालक, बोट मालक यांनाही फायदा होणार आहे. देशाच्या विचारसरणीत खूप बदल झाला आहे, त्याचाच परिणाम म्हणून आज भारत क्रीडा क्षेत्रात अधिक यशस्वी होत आहे. वाराणसीमध्ये गंजरी, राजतलब येथे ३० एकर जागेत सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाने हा आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारला जाणार आहे. या स्टेडियमच्या रचने संदर्भातली प्रेरणा ही भगवान शिवाकडून घेण्यात आली असून यासाठी विविध प्रकारच्या रचना विकसित केल्या जाणार आहेत.
हे स्टेडियम चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण असणार आहे, त्रिशुळाच्या आकाराचे फ्लड-लाइट (प्रकाश योजना), घाटाच्या पायऱ्यांवर आधारित आसन व्यवस्था, स्टेडियमच्या दर्शनी भागावर बिल्वपत्राच्या (बेलाच्या पानाच्या) आकाराचे धातूचे पत्रे बसवले जातील. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही ३०,००० पर्यंत असेल. उत्तर प्रदेश सरकारने भूसंपादनासाठी १२१ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर बीसीसीआय स्टेडियम बांधण्यासाठी ३३० कोटी रुपये खर्च करणार आहे.