बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पकडला अप्रतिम झेल; व्हिडीओ व्हायरल

    मुंबई : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सध्या एक दिवसीय मालिका खेळवली जात आहे. काल भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र क्षेत्ररक्षणात विराट कोहलीने पुन्हा एकदा त्याच्यातील उत्कृष्ट फिल्डरचे कौशल्य दाखवले.

    विराट कोहलीच्या या कमाल कॅचचं सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बांग्लादेशच्या फलंदाजीदरम्यान २४ व्या षटकात विराट कोहलीनं शाकिबचा अफलातून झेल घेतला. झेल घेण्यासाठी विराट कोहलीला हवेत झेपवावं लागलं होतं. विराट कोहलीनं हवेत झेपवत एका हातात झेल घेतला. विराट कोहलीचा झेल पाहून भारतीय खेळाडूंसोबत बांगलादेशचे खेळाडू आणि प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले होते.