प्लेऑफमध्ये कोणते संघ करणार प्रवेश; चेन्नई की आरसीबीला मिळणार स्थान; भज्जी-कैफने कुणाला दिली पसंती; वाचा एकाच क्लिकवर

  IPL 2024 Playoffs Team : आयपीएल 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे झुकली आहे. आतापर्यंत तीन संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई, पंजाब आणि गुजरात यांचं स्पर्धेतील आव्हान संपलेय. तर कोलकाता नाईट रायडर्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता तीन जागांसाठी सहा संघामध्ये स्पर्धा सुरु आहे. यामध्ये राजस्थान, हैदराबाद, चेन्नई, आरसीबी, लखनौ आणि दिल्ली या संघाचा समावेश आहे. यामधील राजस्थानचं प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जातेय. पण दोन जागांसाठी पाच संघामध्ये स्पर्धा होणार आहे.

  आरसीबी आणि चेन्नई यांच्यात महत्त्वाची लढत
  आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील लढत सर्वात महत्वाची ठरणार आहे. शनिवारी 18 मे रोजी चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर लढत होणार आहे. या लढतीनंतरच आयपीएलचा चौथा संघ ठरणार असल्याचं बोललं जातेय. गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ आणि हरभजन सिंह यांनी प्लेऑफचे चार संघ निवडले आहेत. कैफ आणि भज्जी यांच्यामध्ये चौथ्या जागांवरुन मतभेद असल्याचं दिसले.
  गुजरात विरुद्ध कोलकाता सामना पावसामुळे होणार रद्द
  गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आला. या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर मोहम्मद कैफ आणि हरभजन सिंह यांनी प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या चार संघाचा अंदाज व्यक्त केलाय. यामध्ये चौथ्या संघावरुन दोघांमध्ये मतभेद दिसून आले.

  भज्जीने निवडलेले चार संघ
  स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात भज्जीने चार संघामध्ये आरसीबीची निवड केली. हरभजन सिंह यानं चेन्नईला डावलून आरसीबीला पसंती दर्शवली. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीने केलेल्या कामगिरीमुळे भज्जी प्रभावित झाला. त्यामुळे आरसीबीला संधी मिळायला हवी, असे भज्जी म्हणाला. भज्जीने कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि आरसीबी हे चार संघाला प्लेऑफमध्ये पोहचतील असा अंदाज वर्तवलाय.
  कैफचं मत काय?
  मोहम्मद कैफ यानेही पहिल्या तीन संघामध्ये कोलकाता, राजस्थान आणि हैदराबाद या तीन संघाला स्थान दिले. चौथ्या स्थानावर कैफ यानं चेन्नईला ठेवलेय. कैफ म्हणाला की, चेन्नईकडे दबावाच्या सामन्यात खेळण्याची वेगळी शैली आहे. त्यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. प्लेऑफमध्ये कंस पोहचायचं हे चेन्नईला चांगलेच माहिती आहे. आरसीबी दबावाच्या सामन्यात ढेपाळते. त्यामुळे चेन्नईच चौथा संघ असू शकतो.
  लखनऊ आणि दिल्ली करताहेत प्लेऑफसाठी धडपड
  लखनऊ आणि दिल्ली यांच्याबाबतही कैफ आणि भज्जी यांनी मतं व्यक्त केली. हे दोन्ही संघही प्लेऑफसाठी धडपड करत आहेत. यामध्ये लखनौच्या संघाला जास्त संधी आहे. कारण, त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये धडक देतील.